भीमा नदीचा पुर ओसरताच महसूल प्रशासनाची पंचनामा प्रक्रिया सुरू

हुकूम मुलाणी 
रविवार, 11 ऑगस्ट 2019

भीमा नदीच्या पात्रातील पुराच्या पाण्याचा लोंढा ओसरताच सुट्टीच्या दिवशीही महसूल प्रशासनाने पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर नुकसानीची आकडेवारी निश्चित होणार आहे.

मंगळवेढा : भीमा नदीच्या पात्रातील पुराच्या पाण्याचा लोंढा ओसरताच सुट्टीच्या दिवशीही महसूल प्रशासनाने पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.त्यानंतर नुकसानीची आकडेवारी निश्चित होणार आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वीच्या पुराचा अनुभव लक्षात घेता महसूल प्रशासनाने यंदा शासकीय उपाययोजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. उपविभागीय अधिकारी उदय भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे,निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, यांनी मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल यांना पूरग्रस्त भागात भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या.

आठ गावातील 159 कुटुंबातील 920 व्यक्तींना पुराच्या तडाख्याला सामोरे जावे लागले यासाठी महसूल प्रशासनाने रॉकेल, तांदूळ, गहू आदी साहित्य उपलब्ध करून दिले. याशिवाय सर्व लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्त लोकांना भेट देऊन दिलासा देत आधार देताना कुणी जेवणाचे साहित्य व अन्नदान कार्य केले त्यामुळे अशा संकटसमयी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचा आधार मोलाचा ठरला.

दरम्यान आजपासून महसूल प्रशासनाने संबंधित गावचे तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायक यांना या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पिकाच्या नुकसानीची आकडेवारी समोर येणार आहे तर, नगरपालिकेचे शाखा अभियंता, सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंत्याकडून घराच्या नुकसानीची आकडेवारी निश्चित करण्यासाठी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात नुकसानीची आकडेवारी निश्चित होणार आहे. महसूल प्रशासनाच्या नियोजनाचे मात्र कौतुक होत आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the panchanama process of revenue administration begins at bima river bank