ड्रेनेजलाईनचे काम संथच

युवराज पाटील
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ड्रेनेजलाईनचे कामही कासव गतीने सुरू आहे. आजअखेर ४० किलोमीटर अंतराचे काम होणे अपेक्षित असताना १८ किमी अंतराचे ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ड्रेनेजलाईनचे कामही कासव गतीने सुरू आहे. आजअखेर ४० किलोमीटर अंतराचे काम होणे अपेक्षित असताना १८ किमी अंतराचे ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी ५८ कोटींचा निधी मंजूर झाला. उपनगरातून ११३ किमी ड्रेनेजलाईन टाकण्याचे नियोजन होते. नाळे कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्‍स, निकम पार्क, जिवबा नाना पार्क, तुळजाभवानी कॉलनी, शांती उद्यान कॉलनी, आपटेनगर पाण्याची टाकी, तपोवन परिसर, फुलेवाडी परिसर, पोद्दार स्कूल, साळोखे नगर, राजोपाध्येनगर, क्रांप्तसिंह नाना पाटील नगर या ठिकाणी काम सुरू आहे. सुमारे साडेसातशे चेंबरचे काम पूर्ण झाले आहे. 

घराघरातील ड्रेनेज या चेंबरला जोडून ड्रेनेजलाईनच्या माध्यमातून ते दुधाळी येथील सांडपाणी केंद्राकडे वळवले जाणार आहे. सध्या हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता नाल्याच्या माध्यमातून थेट नदीच्या दिशेने जाते. नागरी वस्तीतील मोठ्या प्रमाणावर मिसळले जाणारे सांडपाणी पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची डोकेदुखी बनत आहे. त्यावर उपाय म्हणून ड्रेनेजलाईनचे काम मंजूर झाले. मात्र, या कामाला गती मिळालेली नाही. काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी, काळवट जमिनी यामुळे काम पुढे सरकले नाही.

११३ किमी अंतराची ही ड्रेनेजलाईन कधी पूर्ण होणार ?, हाच प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे. ४० किमी अंतराचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ १८ किमी अंतराचे ड्रेनेजलाईन टाकले आहे. ड्रेनेजलाईनच्या कामाबरोबर दुधाळी येथील ६ एमएलडी, कसबा बावडा येथील ४ एमएलडीचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही या कामाचाच एक भाग आहे.

ई वॉर्डातही काम नाही 
यापूर्वी शहराच्या विविध भागांत प्रामुख्याने उपनगरात ड्रेनेजलाईन टाकले गेले. मात्र, चेंबरला ते जोडले गेलेले नाही. शहराच्या ई वॉर्डातही ड्रेनेजलाईनचे काम झालेले नाही. टेंबलाईवाडी, विक्रमनगर, हिम्मत बहादूर नगर, कसबा बावडा, जाधववाडी, कदमवाडी या परिसरात ड्रेनेजलाईन अस्तित्वात नाही. ई वॉर्डलाही ड्रेनेजलाईनसाठी निधी मंजूर व्हावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.

Web Title: Panchganga River Pollution Dranageline work