शाहूवाडीत शिक्षण कार्यालयाला टाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

शाहूवाडी - तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी येथील पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आज पंचायत समितीच्या शिक्षण कार्यालयास टाळे ठोकत पंचायत समितीसमोरच दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आजच्या शाळा बंद आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यात १३० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

शाहूवाडी - तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी येथील पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आज पंचायत समितीच्या शिक्षण कार्यालयास टाळे ठोकत पंचायत समितीसमोरच दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आजच्या शाळा बंद आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यात १३० प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

आठ शाळेत तर एकही शिक्षक नाही. या सर्व ठिकाणी शिक्षक मिळावेत, यासाठी पदाधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांची २० दिवसांपूर्वी आढावा बैठक झाली होती; पण त्यानंतरही रिक्त ठिकाणी शिक्षक न दिल्याने पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज तालुक्‍यातील शाळा बंद ठेवाव्यात, यासाठी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य सकाळी साडेअकरा वाजता पंचायत समिती कार्यालयात आले. सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना बाहेर काढून, विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर पंचायत समितीसमोर मुख्य दरवाजासमोर पदाधिकाऱ्यांनी दिवसभर ठिय्या मारला. दरम्यान, गटविकास अधिकारी श्री. वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केली; पण पदाधिकारी निर्णयावर ठाम होते. 

ठिय्या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, आकांक्षा पाटील, पंचायत समिती सभापती अश्‍विनी पाटील, उपसभापती पांडूरंग पाटील, सदस्य डॉ. स्नेहा जाधव, दिलीप पाटील, विजय खोत, अमर खोत, सुनीता पारळे, लतादेवी पाटील आदी सहभागी झाले होते.

जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांशी आजच्या आंदोलनाबाबत बोललो. त्यांनी उद्या दुपारी रिक्त शिक्षक पदांबाबत जिल्हा परिषदेमध्ये बैठक बोलावली आहे, त्यात निर्णय होईल. सध्या दहा शिक्षक दिले आहेत. 
- अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी, शाहूवाडी.

जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी उद्या दुपारी ४ वाजता जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात बैठक बोलावली आहे. योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू.
- हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य

रिक्‍त शिक्षक पदांबाबत आढावा बैठक घेऊनही प्रशासनाने पुढील कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ज्या शाळांत शिक्षक नाहीत, तेथील ग्रामस्थांना तोंड देणे आम्हाला मुश्‍कील झाले आहे. आमच्या तालुक्‍यात शिक्षक देण्यात नेहमीच अन्याय होत आहे.
- अश्‍विनी पाटील, सभापती, शाहूवाडी

Web Title: Panchyat Committee Zp employee agitation