काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे भाजपच्या संपर्कात

Kalyanrao Kale
Kalyanrao Kale

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील दोन साखर कारखाने, अनेक शैक्षणिक संस्था, पतसंस्था यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. माढा लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीने काळे यांच्या भूमिकेला सद्यस्थितीत अतिशय महत्त्व आहे.

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना तसेच खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना श्री. काळे यांच्या ताब्यात आहे. तालुक्‍यातील अनेक शैक्षणिक संस्था तसेच पतसंस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. पंढरपूर तालुक्यात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून श्री. काळे हे काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षे काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करून देखील काँग्रेस पक्षाकडून उपेक्षा केली जात आहे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत श्री. काळे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तर लोकसभा निवडणुकीत काळे यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना पंढरपूर तालुक्यातील गावांमधून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांचे राजकीय विरोधक संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे श्री.काळे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी सोनके (ता. पंढरपूर) येथे माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. श्री. काळे हे पंढरपूर मध्ये असताना देखील ते या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते.

दरम्यान, श्री. काळे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात श्री. काळे यांच्याशी संपर्क साधला असता 'सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, 'बँकेच्या कामाच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा किंवा नाही याचा निर्णय घेणार आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com