दशक्रिया विधीसाठी पंढरपुरात तज्ज्ञ ब्राह्मणांचे शॉर्टेज

अभय जोशी
बुधवार, 15 मे 2019

सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता..
चंद्रभागेच्या वाळवंटात जिथे हे धार्मिक विधी केले जातात तिथे सावलीची व्यवस्था नाही. भर उन्हात वाळवंटात विधी सुरू असतात आणि आबालवृद्धांना तिथेच थांबावे लागते. परिसरात कमालीची अस्वच्छता असते. परगांवाहून आलेले लोक चंद्रभागेत कुठेही अस्थी विसर्जन करतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटल्या विकत घेऊनच तहान भागवावी लागते.हे लक्षात घेऊन एका ठिकाणी असते कुंड सावलीसाठी शेड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि लोकांना बसण्यासाठी कट्टे बांधण्याची गरज आहे.

पंढरपूर : येथील चंद्रभागेच्या वाळवंटात दशक्रियाविधी, श्राद्ध, तर्पण, पिंडदान आणि अस्थी विसर्जन आदी विधी केले जातात. गेल्या काही वर्षात पंढरपूरला येऊन दशक्रियाविधी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. विधी करणाऱ्या ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील लोकांची संख्या केवळ दहा ते बारा असून विधी करण्यासाठी येणार्‍या लोकांच्या तुलनेत ही संख्या अपुरी पडत आहे. या व्यवसायात पैसे मिळत असले तरीही तो करायला ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील नवीन पिढीतील तरुणांची मानसिकता नसल्याने काम जास्त आणि या विषयातील तज्ञ लोकांची संख्या कमी असे चित्र या व्यवसायात पाहायला मिळत आहे.

पंढरपुरला दक्षिण काशी समजले जाते. त्यामुळे पंढरपूरला दशक्रिया विधी साठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. चंद्रभागेच्या वाळवंटात श्री पुंडलिक मंदिरालगत जागोजागी अशा पद्धतीचे विधी वर्षभर सुरू असतात.अनेक वेळा विधींची संख्या वाढल्याने संबंधित ब्राह्मण अथवा गुरव एकाच वेळी तीन ते चार जणांचा विधी करताना दिसतात. त्यामुळे विधी करण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या अधिक आणि विधी करणारे ब्राह्मण व गुरव कमी अशी परिस्थिती पाहायला मिळते.

पंढरपुरात गेल्या काही वर्षांपूर्वी तज्ञ लोकांकडून शास्त्रोक्त पद्धतीने अंतेष्टी व पिंडदान कर्म केले जात असे. आता तशा पद्धतीचे काम येथे मोजकेच लोक करत असून त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी झाली आहे. सध्या सुमारे दहा ते बारा ब्राह्मण, गुरव आणि सोनार समाजातील लोक दशक्रिया विधी अस्थिविसर्जन अशा प्रकारचे विधी चंद्रभागेच्या वाळवंटात करून या व्यवसायावर उपजीविका करतात. परंपरागत हा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या बरोबरच या क्षेत्रात आता नव्याने काही लोकांचा समावेश झाला आहे. चार-पाच जणांचा अपवाद वगळता इतर ब्राम्हण शास्त्रोक्त पद्धतीने विधी करताना दिसत नाहीत. अशा मंडळींकडून केली जाणारी  विधीची पद्धत पाहून परगावाहून मोठ्या श्रद्धेने आलेल्या लोकांचे समाधान होत नाही.

,....एजंटांना द्यावे लागते 50 टक्के कमिशन..
याही क्षेत्रात आता एजंटगिरी सुरू झाली आहे. दररोज सकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात सात ते बारा या वेळात विधीसाठी आलेल्या लोकांची गर्दी असते. . एसटी स्टँड, रेल्वे स्थानक तसेच वाहनतळ या ठिकाणाहून वाळवंटाकडे धार्मिक विधीसाठी निघालेल्या लोकांना एजंट मंडळी गाठतात. त्यांना अवाच्या सवा रक्कम सांगून ब्राम्हण, गुरव अथवा वाळवंटातील सोनार यांच्यापर्यंत आणून सोडतात. त्याबदल्यात संबंधित एजंटास 50 टक्के रक्कम कमिशन म्हणून द्यावी लागते.

.. असे ठरते पॅकेज...
वेगवेगळ्या व्यवसायात सध्या पॅकेज संस्कृती उद यास आली आहे. त्याप्रमाणे याही क्षेत्रात पॅकेज पद्धत सुरू झाली आहे. धार्मिक विधी साठी लागणारे साहित्य पितळ आणि तांब्याची भांडी, तांदूळ, दर्प, गोवऱ्या आदी साहित्य संबंधित लोकांना आणण्यास सांगण्याऐवजी हे सर्व संबंधित ब्राह्मण अथवा गुरवच आणतात. त्यासाठी एक पॅकेज आहे. विधी करण्यासाठी आलेल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन पॅकेजचे दर सांगितले जातात. योग्य मोबदला घेणारे जसे आहेत तसेच याही क्षेत्रात अवाच्या सव्वा मागणी करणारी मंडळी देखील आहेत. दहावा, अकरावा, बारावा, पंचक किंवा त्रिपाद शांती आणि यजमानाच्या घरी उदकशांती यासाठीच्या एकत्रित कॉम्बो पॅकेजसाठी 25 हजारापासून पन्नास हजारापर्यंत दर सांगितले जातात.

परंपरागत पौरोहित्य करणारे विद्वान दिलीप जोशी आणि सुनील ताठे म्हणाले दररोज 30 ते 50 च्या दरम्यान विधी येथे होतात. सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने व्हावेत यासाठी या क्षेत्रातील वेदमूर्ती विद्वानांची आठ ते दहा दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता..
चंद्रभागेच्या वाळवंटात जिथे हे धार्मिक विधी केले जातात तिथे सावलीची व्यवस्था नाही. भर उन्हात वाळवंटात विधी सुरू असतात आणि आबालवृद्धांना तिथेच थांबावे लागते. परिसरात कमालीची अस्वच्छता असते. परगांवाहून आलेले लोक चंद्रभागेत कुठेही अस्थी विसर्जन करतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटल्या विकत घेऊनच तहान भागवावी लागते.हे लक्षात घेऊन एका ठिकाणी असते कुंड सावलीसाठी शेड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि लोकांना बसण्यासाठी कट्टे बांधण्याची गरज आहे.

Web Title: Pandharpur lacks in brahmans for performing last rituals