पंढरपूरला पुन्हा परिचारक, मंगळवेढा भालके-शहा गटाकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

सांगोला, बार्शी, अक्कलकोट, दुधनीत मात्र परिवर्तन, सांगोल्यात शेकापला, दुधनीत कॉंग्रेसला धक्का

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता. 28) घोषित झाले. तेव्हा अनेक दिग्गजांना धक्का बसला असून, सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजीमंत्री बार्शीचे आमदार दिलीप सोपल, कॉंग्रेसचे माजीमंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे या दिग्गजंजाच्या गटांना त्यांच्याच गावात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंढरपुरात मात्र पुन्हा परिचारक गटाने आपली सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठीच राजकीय धुळवड रंगली होती. या नऊ नगरपालिकांमध्ये काही ठिकाणी स्थानिक आघाड्या, शिवसेना-भाजप महायुती आणि काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती तर कुठे स्वतंत्रपणे लढती झाल्या. त्यात सांगोल्यात शेकाप-राष्ट्रवादीची अनेक वर्षांची युती यंदा महायुतीने संपवली. या ठिकाणी महायुतीच्या राणी माने या नगराध्यक्ष झाल्या. येथे महायुतीने 8 जागा जिंकल्या. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुखांना हा धक्का मानला जातो. पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या आघाडीच्या साधना भोसले विजयी झाल्या आहेत. कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या गटाला येथे पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे प्रा. बी. पी. रोंगे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याठिकाणी परिचारक गटाने 16 जागा मिळवल्या. विरोधी कॉंग्रेसला 9, भाजपाला 4, अपक्षांनी 5 जागा मिळवल्या.

कुर्डुवाडीतही शिवसेनेने पुन्हा एकदा बाजी मारली. याठिकाणी स्वाभिमानी आघाडीने नऊ जागा जिंकल्या. पण नगराध्यक्षपदी शिवसेनेचे समीर मुलाणी विजयी झाले. दुधनी या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना त्यांच्याच गावातील नगराध्यक्षपदी गमवावे लागले. येथे भाजपचे भीमराव इंगळे विजयी झाले. पहिल्यांदाच इथेही सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे नेते, बार्शीचे माजी मंत्री, आमदार दिलीप सोपल यांनाही त्यांचे पारंपरिक विरोधक शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी धक्का दिला आहे. येथे शिवसेनेचे असिफ तांबोळी हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बार्शीत सर्वाधिक 29 जागा शिवसेनेने मिळवल्या. राष्ट्रवादीला केवळ 11 जागा मिळवता आल्या. मंगळवेढ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अरुणा माळी नगराध्यक्ष झाल्या. आमदार भारत भालके आणि राहुल शहा गटाला इथे जनतेने कौल दिला आहे. तर करमाळ्यात आमदार शामलताई बागल आणि जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता मिळवली. येथे जगताप यांचे चिरंजीव वैभव जगताप नगराध्यक्ष होणार आहेत. मैंदर्गीत स्थानिक केसूर गटाने सत्ता मिळवली. अक्कलकोटला भाजपने परिवर्तन केले आहे. येथे भाजपने 14 जागा मिळवल्या. भाजपच्या शोभा खेडगी या नगराध्यक्ष झाल्या आहेत.

Web Title: pandharpur nagar panchayat election result