पंढरपूर दर्शन मंडप एसी कराः चंद्रकांत दळवी

पंढरपूर येथील वर्षानुवर्षे कागदावर असलेले नियोजीत संतपीठाचे संकल्पचित्र.
पंढरपूर येथील वर्षानुवर्षे कागदावर असलेले नियोजीत संतपीठाचे संकल्पचित्र.

पंढरपूरः पंढरपूर येथील नदीच्या पैलतीरावर प्रति पंढरपूर वसवणार, तिथे तीर्थक्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन वीणा, पखवाज अशा आकाराची भक्त निवास बांधणार, 65 एकराचा वापर वर्षभर व्हावा यासाठी थीम पार्क उभारणार, संतपीठ उभारणार, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या सहा मजली दर्शन मंडपात विमानतळाप्रमाणे सरकते जीने बसवणार अशा घोषणा त्या त्या वेळच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. आता विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दर्शन मंडप ए.सी करण्याची सूचना केली आहे. अधिकारी आणि पदाधिकारी बदलले की पंढरपूर येथील विकास कामे आणि त्यांचा प्राधान्यक्रम बदलत असून, शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्याने अनेक कामे रखडत आहेत.

विभागीय आयुक्त श्री. दळवी यांनी पंढरपूर येथील बॅंक ऑफ बडोदा मध्ये काही वर्षे नोकरी केलली आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूरची चांगली माहिती आहे. पंढरपूर विषयी त्यांना आत्मियता आहे. त्यामुळेच त्यांनी विभागीय आयुक्त म्हणून पदभार घेतल्यावर काल पंढरपुरात येऊन दिवसभर पंढरपूरच्या विकास कामांची बारकाईने पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांनी पंढरपूर येथील विकास कामांमध्ये जिव्हाळ्याने लक्ष घातले आहे. ही बाब निश्‍चितच स्वागतार्ह आहे. तथापी अधिकारी आणि पदाधिकारी बदललेले की नवीन कल्पना पुढे येऊन पूर्वीची कामे व त्याचे आराखडे तसेच पडतात असा अनुभव पंढरपूरकरांना असल्याने आता तसे होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

नदीच्या एकाच बाजूला गर्दी होते म्हणून नदीच्या पैलतीरावर वारकरी सुविधा केंद्र बांधून तिथे सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी वारकरी सुविधा केंद्रासाठीचे आराखडे तयार करण्यात आले होते. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने वारकरी सुविधा केंद्राच्या इमारती वीणा, पखवाज अशा आकाराची वेगळे रचना असावी अशा कल्पना त्या त्या वेळच्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी मांडल्या होत्या. नंतरच्या अधिकाऱ्यांनी नदीच्या पैलतीरावर वारकरी सुविधा केंद्र बांधण्याचा निर्णयच रद्द केला. मंदिर समितीच्या वतीने संतपीठाची सुमारे शंभर एकर जागेत उभारणी केली जाईल असे पंधरा, वीस वर्षांपासून सांगितले जात आहे. त्यासाठीचे आराखडे तयार केले आहेत. परंतु, अजून संतपीठासाठी जागा देखील मिळालेली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हे संतपीठ कागदावरच आहे.

आण्णा डांगे मंदिर समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी दर्शन मंडपात वारकऱ्यांना जीने चढ उतार करावे लागू नयेत यासाठी विमानतळा प्रमाणे सरकते जिने बसवणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. वास्तविक पहाता मंदिर परिसरात स्वच्छतागृहे नसल्याने दर्शन रांगेत तासनतास थांबून दर्शन घेऊन आलेल्या भाविकांची स्वच्छतागृहांच्या अभावी गैरसोय होते. महिला भाविकांची व आजारी भाविकांची तर अतिशय कुचंबना होते. त्यामुळे समितीकडून प्राधान्याने स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. दळवी यांनी दर्शन मंडपात ए.सी. बसवण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी होणार का, तिथली सध्याची रचना ए,सी.बसवण्यास योग्य आहे का याचा विचार झाला पाहिजे.

तुकाराम मुंढे जिल्हाधकारी असताना उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उपलब्ध असलेल्या अवघ्या काही दिवसात 65 एकरात वारकऱ्यांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यांमधून देखील त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत झाले होते. सर्वसामान्य पंढरपूरकर नागरिकांच्या देखील श्री.मुंढे आणखी काही काळ जिल्हाधिकारी हवे होते अशा भावना होत्या. त्यांच्या बदली नंतर पंढरपुरातील सर्व कामे मंदावली. श्री.दळवी यांनी काल 65 एकर मध्ये काही कामे निकृष्ट झाली असल्याचे सांगून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून काय बाहेर येते आणि कोणत्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई होते हे आगामी काळात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com