कोपर्डीतील आरोपींना फाशीच व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरणारः सुप्रिया सुळे

अभय जोशी
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पंढरपूर (सोलापूर): येत्या तीन महिन्यात कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर न झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरुन पंढरपूर पासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार)येथे जाहीर केले.

पंढरपूर (सोलापूर): येत्या तीन महिन्यात कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर न झाल्यास आपण स्वतः रस्त्यावर उतरुन पंढरपूर पासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार)येथे जाहीर केले.

"युवा संवाद" यात्रेच्या निमित्ताने आज सकाळी त्यांनी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील युवक युवतींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सौ. सुळे म्हणाल्या, सोमवारी (ता. 18) आपल्याला एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीने कोपर्डी घटनेच्या संदर्भातील आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्‍न केला. तेंव्हा त्यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याची माहिती मी तीला दिली. वास्तविक पहाता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, तीन महिन्यात आरोपीना फाशी द्यायला पाहिजे होते. एक महिला म्हणून माझी तशी अपेक्षा होती. आता फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालू आहे. परंतु, अजूनही त्या खटल्याचा निकाल लागलेला नाही. येत्या तीन महिन्यात या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर मी रस्त्यावर उतरणार आहे. पंढरपूर पासून त्या आंदोलनाची सुरुवात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मुलींची छेडछाड, हुंडा प्रथा, व्यसनाधिनता यासह अनेक विषयांच्या संदर्भात सौ. सुळे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आम्ही हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशा प्रतिज्ञा यावेळी बोलताना केल्या. काही विद्यार्थ्यांनी व्यसनामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे सांगून शासनाने दारु, तंबाखू, गुटका अशा सर्व प्रकारच्या व्यसनांवर बंदी घातली पाहिजे, अशा मागणी सौ. सुळे यांच्यापुढे बोलताना व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या शिस्तीमुळे महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थीनीची छेडछाड होत नसल्याचे विद्यार्थीनींनी सांगितले. तेंव्हा छेडछाड होत नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे. महाविद्यालयीन विद्यार्थींनीकडून त्या सुरक्षित असल्याचे ऐकण्याची माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगून सौ. सुळे यांनी प्राचार्य डॉ. जाधव तसेच उपस्थित पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचे कौतुक केले. गावोगावच्या महाविद्यालयातील अशा कार्यक्रमांमधून माझ्यापुढे येणारे प्रश्‍न केवळ ऐकून सोडून न देता ते सुटावेत यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सौ. सुळे यांनी जाहीर केले.

सौ. सुळे यांनी आपलेपणाने आणि जिव्हाळ्याने मनोगते ऐकल्यामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. अनेक विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अडचणी ऐकून ते प्रश्‍न सोडवण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करीन, असे आश्‍वासन सौ. सुळे यांनी दिल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजूबापू पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मै हूं ना...
प्रतिक्षा निमगिरे या विद्यार्थीनीने मल्लखांब क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पर्यंत गेल्याचे सांगितले. परंतु, 2016च्या शासन आदेशामध्ये मल्लखांबचा समावेश नसल्यामुळे आपल्याला अपेक्षित लाभ होत नसल्याची खंत व्यक्त केली. तेंव्हा सौ. सुळे यांनी तीला प्रतिसाद देत "मै हूं ना "असे म्हणून तुझा प्रश्‍न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून मी एक हजार टक्के मार्गी लावेन असे जाहीर केले.

हे सरकार पूर्णपणे अपयशी...
सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याची मागणी दोन समाजाकडून केली जात आहे. त्या संदर्भात सर्वांशी चर्चा करुन शासनाने निर्णय घेतला पाहिजे. या विषयी शासनाचे मिस मॅनेजमेंट आहे, असे मत सौ. सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या सरकारला तटस्थ भिमूकेतून तुम्ही पाहिले तर किती मार्क देताल या विषयाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, मार्क नाही देऊ शकत परंतु हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे नक्की.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pandharpur news kopardi rape case and supriya sule