...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल: आमदार बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

भोसे (क): कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

भोसे (क): कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आमदार कडू आज (सोमवार) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. भोसे (ता. पंढरपूर) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरकारने केलेल्या कर्जमाफीविषयी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, सोसायटी अध्यक्ष रावसाहेब पाटील, उपसरपंच गणेश पाटील, प्रहार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ता मस्के, औद्योगिक प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख राजू येवले, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कोरके, विश्‍वनाथ भिंगारे, सुनील तळेकर, नागन्नाथ भांडे, भास्कर कोरके आदी उपस्थित होते.

आमदार कडू म्हणाले, कर्जमाफीचा निर्णय हा संभ्रम करणार असल्याने सुकाणू समितीने तो मान्य केलेला नाही. त्यासाठी 10 जुलैपासून राज्यभर जनजागरण यात्रा काढणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांसमोर शासन निर्णयाची पोलखोल करणार आहे. संतांचे कार्य हे पांडुरंगापुरते मर्यादित नसून ते शेतकऱ्यांपर्यंत आहे. संत तुकाराम महाराज यांनी पहिल्यांदा कर्जमाफी केली होती. असे सांगून मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करण्यापासून रोखू नका; निदान पूजेनंतर तरी पांडुरंग त्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची सद्‌बुद्धी देईल, असे ते म्हणाले. या वेळी उपसरपंच गणेश पाटील यांनी त्यांचे स्वागत करून मराठवाडा, विदर्भ या भागाकडे ज्याप्रमाणे लक्ष देत आहात त्याचप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची विनंती केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'उरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे काय?'
भोसे (ता. पंढरपूर) येथील एकूण कर्जदार शेतकऱ्यांच्या दोन कोटी 61 लाख रुपयांच्या थकीत कर्जापैकी केवळ 41 सभासद शेतकऱ्यांना 35 लाख रुपये कर्जमाफ होणार आहे. उरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे काय? असा सवाल सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला.

Web Title: pandharpur news mla bacchu kadu and devendra fadnavis