श्री विठ्ठल हे भक्तीचे दैवत: मोहन भागवत

पंढरपूर येथे गुरुवारी सकाळी श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. त्याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज.
पंढरपूर येथे गुरुवारी सकाळी श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. त्याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज.

श्री विठ्ठला बरोबरच संत चोखोबांचेही घेतले दर्शन

पंढरपूरः श्री विठ्ठल हे भक्तीचे दैवत आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही जन्मोजन्मांतरीच्या भाग्याची गोष्ट आपण मानतो. येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व सहकार्य केले जाईल. मंदिर समितीचे सर्व उपक्रम उत्तम आहेत. या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. विशेष म्हणजे श्री. भागवत यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी बरोबरच संत चोखामेळा व संत नामदेवांच्या समाधीचे ही भक्तीभावाने दर्शन घेतले.

पंढरपूर येथे विविध संप्रदायातील संत व धर्माचार्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी श्री. भागवत हे येथे आले आहेत.

बुधवारी (ता. 17) सायंकाळी त्यांचे येथे आगमन झाले. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष (कै.) विवेकानंद महाराज वासकर यांच्या येथील वाड्यामध्ये त्यांनी मुक्काम केला. आज सकाळी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात त्यांचे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी स्वागत केले.

समितीचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी समितीच्या विविध योजनांच्या संदर्भात श्री. भागवत यांना माहिती दिली. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी टोकन पध्दतीने दर्शन व्यवस्था केली जाणार आहे. मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभा केली जात आहे. संत विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरु असून त्या विषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. भाविकांशी कसे वागावे या विषयी कर्मचाऱ्यांना यशदा कडून प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी यावेळी आवर्जुन नमूद केले. तेंव्हा श्री. भागवत यांनी सर्व उपक्रम उत्तम असल्याचे सांगून कौतुक केले.

श्री. भागवत यांच्या समवेत संघाचे कुटुंब प्रबोधन गतीविधीचे राष्ट्रीय संयोजक प्रा. डॉ. रविंद्र जोशी, संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचारक विजयराव पुराणीक, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव, पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे, सोलापूर जिल्हा संघचालक माधवराव मिरासदार उपस्थित होते.

श्री. भागवत यांचा डॉ. भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, भास्करगिरी महाराज, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com