चंदनचोरी प्रकरणातील दोघे पंढरपूरजवळ जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पंढरपूर - चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटिकेमधील चंदन चोरी प्रकरणी पोलिसांच्या पथकांनी तीन ठिकाणी छापे घातले. यात पंढरपूर तालुक्‍यातील आडीव गावातून सूत्रधारासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे 50 लाखांचे रक्तचंदन लाकूडही जप्त केले. इतर संशयितांच्या शोधासाठी पथके मुंबईला रवाना झाली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

चिखलीतील वन विभागाच्या नर्सरीत कर्मचाऱ्यांना बांधून चोरट्यांनी 18 जुलैला पाऊण कोटी चंदनावर दरोडा टाकला होता. त्यानंतर महामार्गावरील हॉटेल, ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासाला सुरवात झाली. पाच वेगवेगळ्या पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू होता. वनमजुराकडून मिळालेल्या माहिती आधारे संशयितांची रेखाचित्रे तयार करण्यात आली. त्यातून काही तस्करांची नावे पुढे आली. चंदनाच्या लाकडाला चीनमध्ये मोठी मागणी असल्याने सागरी मार्गाने त्याची तस्करी होण्याची शक्‍यता ओळखून पोलिसांनी बंदरांवर लक्ष केंद्रित केले. आज पोलिसांच्या पथकांनी एकाचवेळी मच्छिंद्रगड (ता. वाळवा), सांगली शंभर फुटी रस्ता आणि आडीव (ता. पंढरपूर) येथे छापे घातले. यात आडीव गावातून दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मध्यस्थांमार्फत चंदन विक्री केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. येथील एका शेतातून सुमारे 50 लाखांचे रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले. युनूस आणि अकबर अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे असल्याचेही प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव झाडे त्यांची अधिक चौकशी करीत आहेत. 

चंदनाचे तेल सागरी मार्गाने परदेशात पाठविल्याचेही तपासात पुढे येत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक मुंबईला तातडीने रवाना झाले आहे. तसेच, दुसरे पथक शिमोगा येथेही रवाना झाले आहे. ताब्यात घेतलेल्यांचे आणखी साथीदार असून, त्यांचाही वेगवेगळ्या पथकांद्वारे शोध सुरू आहे. एक पथक सोलापुरात तळ ठोकून आहे. संशयितांच्या मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, तपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.

Web Title: pandharpur news Sandalwood theft