श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थान पंढरपूर ऍपचे अनावरण

अभय जोशी
सोमवार, 19 मार्च 2018

पंढरपूर ः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराची माहिती, महात्म्य, मंदिर समितीच्या योजना, भक्त निवास माहिती, ऑन लाईन दर्शन व देणगी, संपर्क क्रमांक अशी सर्वंकष माहिती आता मोबाईल ऍपव्दारे उपलब्ध होणार आहे. मंदिर समितीने मनोरमा सोशल मोबाईल ऍनालिटिक्‍स क्‍लाऊड कोल्हापूर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या मोबाईल ऍपचे अनावरण आज (सोमवार) मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

पंढरपूर ः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराची माहिती, महात्म्य, मंदिर समितीच्या योजना, भक्त निवास माहिती, ऑन लाईन दर्शन व देणगी, संपर्क क्रमांक अशी सर्वंकष माहिती आता मोबाईल ऍपव्दारे उपलब्ध होणार आहे. मंदिर समितीने मनोरमा सोशल मोबाईल ऍनालिटिक्‍स क्‍लाऊड कोल्हापूर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या मोबाईल ऍपचे अनावरण आज (सोमवार) मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीची बैठक आज दुपारी श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चंद्रभागा नदीवर स्नानासाठी येणाऱ्या महिलांसाठी चेंजींग रुम उभा करणे यासह अनेक महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. यावेळी या मोबाईल ऍपचे अनावरण करण्यात आले. श्री श्रेत्र पंढरपूरचे पर्यटन दृष्ट्या महत्व वाढवण्यासाठी आणि भाविकांना मंदिरा विषयी एकत्रित माहिती मिळावी यासाठी हे ऍप तयार करण्यात आले आहे. गुगुल ऍप स्टोअर वर "श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थान पंढरपूर" या नावाने हे ऍप मोफत उपलब्ध होणार आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर आणि अंतर्गत भागाच्या स्वच्छतेसाठी दोन कोटी 48 लाख रुपये खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या . त्या तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पाच कंपन्यांच्या पैकी सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट, बीएसए कार्पोरेशन लिमिटेड आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.

शहरातील व परिसरातील सर्व परिवार देवतांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात भाविकांना शुध्द पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंदिर समितीने शहरात वेगवेगळ्या पाच ठिकाणी वॉटर ए.टी.एम. बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली. गोशाळेचे नूतनीकरण करणे, 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीतील चैत्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोईसुविधा देणे, नव्याने उभारण्यात येत असलेलल्या भक्त निवासची देखभाल खासगी व्यवस्थापनाकडून करण्या विषयी शिर्डी व तुळजापूर देवस्थानच्या धर्तीवर प्रस्ताव करणे, सध्या बुंदी लाडूची विक्री प्लॅस्टीक पिशव्यांमधून केली जाते त्याऐवजी ते कापडी पिशव्यांमधून देणे आदी निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, सचिन अधटराव, डॉ.दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी रविंद्र वाळूजकर उपस्थित होते.

Web Title: pandharpur news shree vitthal rukmini devasthan pandharpur mobile app