पंढरपूरमध्ये पोलिस नसल्याने श्री विठ्ठल दर्शन रांगेत गोंधळ

अभय जोशी
गुरुवार, 13 जुलै 2017

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी उड्डाणपूलावरुन जाण्यासाठी आज सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्रक्षाळपूजेमुळे दर्शन रांग काही वेळ थांबवण्यात आली होती. उड्डाणपूलाचा दरवाजा बंद होता आणि गर्दीच्या नियमनासाठी पोलिस नव्हते त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी सदृश्‍यस्थिती निर्माण झाली. शेवटी भाविकांनी उड्डाणपूलाचा दरवाजा तोडून पूल सुरु केला.

पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी उड्डाणपूलावरुन जाण्यासाठी आज सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्रक्षाळपूजेमुळे दर्शन रांग काही वेळ थांबवण्यात आली होती. उड्डाणपूलाचा दरवाजा बंद होता आणि गर्दीच्या नियमनासाठी पोलिस नव्हते त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी सदृश्‍यस्थिती निर्माण झाली. शेवटी भाविकांनी उड्डाणपूलाचा दरवाजा तोडून पूल सुरु केला.

श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेसाठी कासार घाटा पर्यंत उड्डाणपूल करण्यात आला आहे. आषाढी यात्रेची सांगता झालेली असली तरी अजून भाविकांची गावात गर्दी आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर मंदिरात प्रक्षाळपूजा करण्याची प्रथा आहे. यादिवशी मंदिर स्वच्छ धुऊन घेतले जाते. त्यासाठी काही वेळ दर्शन रांग थांबवण्यात आली होती. कासारघाटा जवळ उड्डाणपूलावर जाण्याचा मार्ग आहे. उड्डाणपूलावर लोक जाऊन थांबले तर मग त्यांची गैरसोय होते. त्यामुळे दर्शन सुरु झाल्यावर उड्डाणपूलाचा दरवाजा उघडला जातो. तो पर्यंत हजारो भाविक उड्डाणपूलाच्या मागील बाजूस थांबलेले असतात. पूलाचा दरवाजा उघडला कि पूलावर जाण्यासाठी मग भाविकांचा एकच गोंधळ होतो. ढकलाढकली होते. अबालवृध्द महिला भाविक या ढकलाढकलीत जीव मुठीत घेऊन पुढे जातात. नेहमी घडणारा हा प्रसंग लक्षात घेऊन पूलाच्या ठिकाणी गर्दीच्या नियमनासाठी पोलिस तैनात करण्याची गरज असते. परंतु पोलिस नेमले जात नाहीत.

आज श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने पूलाच्या दरवाजावर दर्शन केंव्हा सुरु होणार आहे. या विषयी सूचना फलक लावला होता. दुपारी चारच्या सुमारास कासार घाटाजवळ उड्डाणपूलाच्या मागे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पूलावर जाण्यासाठी ढकलाढकली होत होती. त्यातच काही भाविकांनी पूलाचा दरवाजा तोडून पूलावर प्रवेश केल्याने गोंधळ आणखी वाढला. चेंगराचेंगरी सदृश्‍यस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती "सकाळ " प्रतिनिधीस समजताच त्यांनी सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांना कळवले. त्यांनी तातडीने पोलिस पाठवले त्यानंतर गोंधळ कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात आली.

उड्डाणपूल लवकर पूर्ण करावा
गर्दीच्या दिवशी नेहमी कासारघाटाजवळ गर्दी होऊन गोंधळ उडतो. गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी मंदिर समितीने उड्डाणपूलाचे उर्वरीत काम पूर्ण करावे. गर्दीच्या दिवशी पूलाच्या जवळ पोलिस तैनात ठेवावेत अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

Web Title: pandharpur news shri vitthal rukmini darshan and queue