पंढरपुरात हजारो वारकरी अडकल्याने केली पर्यायी सोय

अभय जोशी
शनिवार, 9 जून 2018

प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे "सकाळ" शी बोलताना म्हणाले, अधिक महिन्यामुळे पंढरपूरला आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासाची अडचण झाली होती. खासगी वाहनचालकांना बस स्थानकात बोलवून प्रवाशांचे ग्रुप करुन आंम्ही प्रवाशांची सोय करुन देत आहोत. हे करत असताना खासगी वाहन चालकांकडून लूट होऊ नये याची खबरदार घेत आहोत. 

पंढरपूर : अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले हजारो वारकरी एसटी संपामुळे पंढरपुरात अडकून पडले होते. प्रांताधिकारी, सहायक पोलिस अधिक्षक आरटीओ आणि एस,टी अधिकाऱ्यांनी खासगी वाहनांच्या मदतीने या भाविकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न केल्याने भाविकांना दिलासा मिळाला. पंढरपूर -सोलापूर दरम्यान आज शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेच्या चालक वाहकांच्या मदतीने येथून एस.टी गाड्या सोडण्यात येत होत्या. आज सकाळ पासून आरटीओ अधिकारी खासगी वाहने एसटी स्थानकाच्या आत बोलवून भाविकांच्या परतीच्या प्रवासाची सोय करताना दिसत होते. 

अधिक महिन्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक एस.टी, रेल्वे तसेच खासगी बस गाड्यांमधून पंढरपूरला येत आहेत. एसटी कामगारांनी संप सुुरु करण्यापूर्वी हजारो भाविक एसटीने पंढरपूरात दाखल झाले होते. काल (ता.8) पासून संप सुरु झाल्याने येथील एसटी ची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या हजारो भाविकांची पंचाईत झाली होती. अनेक भाविकांना एसटीच्या संपाची कल्पनाच नव्हती. त्यांना परतीच्या प्रवासासाठी येथील एसटी स्थानकावर आल्यावर संप सुरु झाला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गावाकडे परत जायचे कसे असा प्रश्‍न निर्माण होऊन हजारो भाविक अडकून पडले होते. 

दरम्यान उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि एस.टी अधिकाऱ्यांनी भाविकांच्या सोईसाठी एसटी गाड्या सुरु कराव्यात असे आवाहन एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून केले. तथापी भाविकांची अडवणूक करण्याची आमची इच्छा नाही. आमच्या मागण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव संप करणे भाग पडले आहे. त्यामुळे मागण्या ंमान्य होई पर्यंत कामावर येणार नाही अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. शेवटी खासगी बस गाड्यांची मदत घेऊन त्यातून भाविकांची परतीच्या प्रवासाची सोय करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार पांडुरंग ट्रॅव्हल्स, स्वेरी कॉलेज सह काही कॉलेजच्या बस गाड्या एस.टी स्थानकावर बोलवून त्यातून काही मार्गावरील भाविकांची परतीच्या प्रवासाची सोय करण्यात आली. शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेच्या चालक वाहकांची मदत घेऊन पंढरपूर हून सोलापूर कडे जाण्यासाठी आज एसटी गाड्या सोडण्यात येत होत्या, परंतु ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याची एकही एसटी गाडी आज आगारातून बाहेर जाऊ शकली नाही. 

प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे "सकाळ" शी बोलताना म्हणाले, अधिक महिन्यामुळे पंढरपूरला आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासाची अडचण झाली होती. खासगी वाहनचालकांना बस स्थानकात बोलवून प्रवाशांचे ग्रुप करुन आंम्ही प्रवाशांची सोय करुन देत आहोत. हे करत असताना खासगी वाहन चालकांकडून लूट होऊ नये याची खबरदार घेत आहोत. 

सोपानराव बाळासाहेब पवार ( रा.लातूर )"सकाळ" शी बोलताना म्हणाले, अधिक महिन्यात आई वडिलाना विठूरायाचे दर्शन व्हावे यासाठी दोन दिवसापूर्वी आई वडीलांना घेऊन पंढरपूरला आलो होतो. मला एसटी संपाची माहिती नव्हती. त्यामुळे काल पासून पंढरपुरात अडकून पडलो होतो. आज सोलापूरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध होत आहे. त्यातून सोलापूरला जाऊन तेथून लातूरकडे पर्यायी व्यवस्था करुन जावे लागणार आहे. 

Web Title: pandharpur warkari hit on st strike