पंढरपूर : माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट बालंबाल बचावले

अभय जोशी
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना जेवण आणि पिण्याचे पाणी पोचवून ट्रॅक्टरमधून परत येत असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह सुमारे दहा कार्यकर्ते पुलावरून वाहून जाताना बालंबाल बचावले.

पंढरपूर : पूरग्रस्तांना जेवण आणि पिण्याचे पाणी पोचवून ट्रॅक्टरमधून परत येत असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह सुमारे दहा कार्यकर्ते पुलावरून वाहून जाताना बालंबाल बचावले. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग काल बुधवारी रात्री नऊच्या सुमारास येथील नवीन पुलावर घडला. भुकेल्या पूरग्रस्त बांधवांच्या आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळेच वाचल्याची भावना या सर्व कार्यकर्त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

येथील नदीकाठावरील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील लोकांना रामबाग तसेच नदीच्या पैलतीरावरील 65 एकर मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या पूरग्रस्तांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि स्थानिक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पुढाकारातून जेवण पुरवले जात आहे. 

काल बुधवारी नदीवरील सरगम सिनेमा समोरील अहिल्या पूल आणि अंबाबाई मैदानावरील नवीन पूल हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे नदीच्या पैल तीरावरील 65 एकर परिसरातील सुमारे 500 पूरग्रस्तांना जेवण कसे पोहोचवायचे असा प्रश्न निर्माण झाला होता.

माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अनंत अंकुशराव आणि त्यांच्यासोबतच्या सुमारे दहा कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने ट्रॅक्टरमधून जेवण आणि पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

पुलावरून वेगाने पाणी वाहत असताना ट्रॅक्टरमधील जेवणाचे सामान, पिण्याचे पाणी भरलेल्या टाक्या आणि कार्यकर्ते यांच्या वजनामुळे ट्रॅक्टर पैलतीरावर सुरक्षित पोचला. शिरसाट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुकेल्या पूरग्रस्तांना जेवण वाटप केले. सर्वांची जेवणे झाल्यावर शिरसाट अनंत अंकुशराव आणि अन्य आठ ते दहा कार्यकर्ते ट्रॅक्टर आणि ट्रॉली सह पुन्हा ट्रॅक्टरमधून पुलावरून परत येऊ लागले.

दरम्यान, पुलावरील पाण्याची पातळी आणखी वाढली होती आणि पाण्याचा वेगही कमालीचा वाढला होता. त्यामुळे पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळण्याच्या स्थितीत आला. ट्रॅक्टर मधील सर्वांच्या डोळ्यापुढे मरण उभे राहिले. आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी दोघा कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे स्टेअरिंग घट्ट ओढून धरले आणि चालकाने ट्रॅक्टरचा वेगही कमी होऊ दिला नाही. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि कोणतीही दुर्घटना न घडता ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यातील कार्यकर्त्यांसह पुलावरून सुखरूप परत आला. मरणाच्या अक्षरशः दारातून परत आलेले कार्यकर्ते काहीवेळ  सुन्न झाले होते.

या घटनेविषयी माजी नगराध्यक्ष शिरसट पाणी अनंत अंकुशराव 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. मदतीच्या उर्मीतूनच जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांना जेवण पोचवण्यासाठी गेलो. परंतु, केवळ त्या पूरग्रस्तांच्या आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळेच पुलावरून वाहून जाता जाता बचावलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpurs Former city president Laxman shirsat saved drown in Water