सांगलीतील रस्त्यांवर, गल्लीत भटक्‍या कुत्र्यांची दहशत

बलराज पवार 
Wednesday, 23 September 2020

महापालिका क्षेत्रात भटक्‍या कुत्र्यांची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. रस्त्यांवर आणि गल्लीत ही कुत्री घोळक्‍याने भटकताना दिसत आहेत.

सांगली : महापालिका क्षेत्रात भटक्‍या कुत्र्यांची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. रस्त्यांवर आणि गल्लीत ही कुत्री घोळक्‍याने भटकताना दिसत आहेत. त्यांच्याकडून जेष्ठ नागरिक, लहान बालकांवर हल्ला होण्याचे प्रकार घडत आहेत. या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणाचा ठेका संपल्याने गेले सात महिने हे काम ठप्प आहे. 

भटक्‍या कुत्र्यांची समस्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊनपासून आजवर हॉटेल व्यवसाय बंद असल्याने त्यांना खाण्यास काही मिळत नाही. त्यामुळे ही कुत्री बेभान झाली आहे. टोळक्‍यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांचा लहान मुलांसह वयोवृध्द नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत तक्रार करुनही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी या भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी काही महिन्यापूर्वी प्रशासनाकडे केली होती. मात्र कारवाई झाली नाही. 

महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदी आणि लसीकरण करण्याची मोहिम राबवली होती. ती सध्या बंद आहे. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही मोहीम तत्काळ सुरु करावी, अशी मागणी श्वान समितीच्या सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका खासगी एजन्सीला त्याचा ठेका दिला होता.

त्याची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. तोवर 1841 श्वानांची नसबंदी, लसीकरण करण्यात आले आहे. ही मोहिम खंडीत ठेवता कामा नये, असे शासनाचे आदेश आहेत. तरीही सात महिन्यापासून श्वान निर्बिजीकरण व लसीकरण मोहिम बंद आहे. ही मोहीम तत्काळ सुरु करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

महापालिकेत कुत्री सोडण्याचा इशारा 
प्रभाग दहामध्ये भटक्‍या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्याकडून जेष्ठ नागरिक, लहान बालकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. कुत्री पकडण्यास टाळाटाळ केली जाते. भटक्‍या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. यापुढे कोणती दुर्घटना घडल्यास, भटकी कुत्री थेट आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडू असा इशारा नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी दिला आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic of stray dogs on the streets of Sangli