‘पानिपत’मध्ये विखुरलेले मराठा बांधव सुमारे 250 वर्षांनी एकत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले.

नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केले.

पानिपतहून मराठा जगबीरभाई टरके, राजस्थानहून (अजमेर) नगरसेवक राजेश घाटे, छत्तीसगडहून देवेंद्र वासीम, मध्य प्रदेशमधून (ग्वाल्हेर) बाळ खांडे, तेलंगणाहून गोविंदराव भिसे-पाटील, प्रतापरावांचे वंशज सचिनसिंह गुर्जर-सरनोबत आदींची उपस्थिती होती. 

श्री. भिसे-पाटील म्हणाले, ‘‘देशात आठ कोटी मराठा बांधव आहेत. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची उभारणी केली. त्याप्रमाणे गरजेच्या ठिकाणी मराठा भवन, मराठा धर्म शाळा उभारण्यासाठी बांधवांनी एकत्र यावे.’’

जगबीरभाई म्हणाले, ‘‘१७६१ मध्ये पानिपत येथे झालेल्या लढाईमध्ये हजारो मराठा सैनिक मारले गेले. शेती व अन्य कामे करावी लागली. पानिपत ही शौर्यभूमी आहे. हरियाना राज्यात पाच लाख मराठा असून त्या बांधवांनी विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. कोल्हापूरचे इतिहास संशोधक वसंतराव मोरे यांनी इतिहासाची माहिती करून दिली. हरियानामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. रोटी-बेटीच्या माध्यमातून समाज जोडला पाहिजे.’’

श्री. खांडे म्हणाले, ‘‘भारत वर्षात मराठा भवन होणे गरजेचे आहे. मध्य प्रदेशात माधवराव शिंदे यांनी मराठा लोकांच्या हिताचे कार्य केले. वर्षातून एकदा मराठा समाजाचे 
संमेलन व्हावे.’’

श्री. घाटे म्हणाले, ‘‘मराठा बाधवांचे जीवन संघर्षमय आहे. मराठा समाज एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. राजस्थामध्ये अनेक गावामध्ये मराठा समाजाचे 
प्राबल्य आहे.’’

पन्हाळगड, विशाळगड, सामानगड, पारगड, राजवंशगड व गोमंतक भूमीतून सात ज्योतींचे आगमन झाले. नेसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापराव गुर्जर पुतळ्यास राज्याबाहेरून आलेल्या मराठा बांधवांनी अभिवादन केले. गुर्जर स्मारक समिती अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर यांनी स्वागत केले. एम. बी. चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

नीलेश पाटील, स्वप्नील घोलप, शिवशाहीर दिलीप सावंत, विनोद बाबर, भैया कुपेकर, अजय खानविलकर गिरीश जाधव, मराठा रियासतचे राजेंद्र मुतकेकर, विक्रमसिंह घाटगे, संदीप माने, आप्पा परब, चेतन घाटगे, संजय मोरे, रवींद्र पाटील, विष्णू निकम, कृष्णराव वाईंगडे, दिगंबर देसाई, एन. डी. कांबळे, भरमान्ना गावडा, यशोमती कुपेकर आदी उपस्थित होते. मराठा रियासत, दुर्गमित्र परिवाराने नियोजन केले. मराठा रियासत संस्थेचे कार्याध्यक्ष महेश पाटील-बेनाडीकर यांनी आभार मानले.

भिसे-पाटलांना ‘स्वराज्य भूषण’ 
समाज संघटित करण्यासाठी झटणारे व हैदराबादमध्ये मराठा भवन उभारणारे नांदेडचे गोविंदराव भिसे-पाटील यांना मराठा रियासत, शिव संस्कार भारततर्फे ‘स्वराज्य भूषण’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipat battle fighter Maratha militant get together after 250 years