पानसरे, नाहाटा यांची नागवडे यांच्याशी गुप्त खलबते 

संजय आ. काटे 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

नागवडे कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर आली असून, त्यासाठी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे.

श्रीगोंदे : नागवडे कारखाना निवडणुकीत विरोधी पॅनलच्या तयारीत असलेले जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याशी आज बंद खोलीत गुप्त खलबते केली. नागवडे यांच्या विरोधात दंड थोपटण्याची तयारी करणारे विरोधकच सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. 

मोर्चेबांधणी सुरू 
नागवडे कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर आली असून, त्यासाठी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. सहकार कायद्यातील 97वी घटनादुरुस्ती सत्ताधारी गटाच्या पथ्यावर पडणार असल्याने, बावीस हजारांपैकी साठ टक्के सभासदांना मतदानाचा हक्कच राहणार नाही.

त्यातच विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे प्रमुख विरोधक असलेल्या आमदार बबनराव पाचपुते यांना मदत करीत, भाजपमध्ये प्रवेश करीत राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याची गणिते त्यांच्या बाजूने वळविली आहेत. 

"ऍन्टीचेंबर'मध्ये आज गुप्त खलबते 
तथापि, नागवडे यांच्याच इशाऱ्यावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला, असा आरोप मध्यंतरी करणारे पानसरे व बाळासाहेब नाहाटा कारखान्यासाठी पॅनलची तयारी करीत आहेत. त्यांना आमदार पाचपुते यांची साथ मिळेल का, हा प्रश्न पुढे येण्यापूर्वीच, या दोन्ही नेत्यांनी नागवडे यांच्याशीच गुप्त खलबते केल्याने, निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका काय राहील, याचीच झलक पाहायला मिळते. 

काष्टी सेवा संस्थेच्या "ऍन्टीचेंबर'मध्ये आज गुप्त खलबते झाली. तीत नागवडे, पानसरे व नाहाटा यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, भगवानराव पाचपुते, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव काकडे, जिल्हा मजूर संस्थेचे संचालक अनिल पाचपुते उपस्थित होते. 

निवडणूक एकत्रच लढायची 
कारखाना निवडणूक कुठल्याही परिस्थितीत एकत्रच लढायची, असा या बैठकीतील चर्चेचा आशय होता. त्यानंतर नागवडे, पानसरे व नाहाटा एकाच मोटारीतून कारखान्यावर गेले व तेथेही दीर्घ काळ बैठक झाली. त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, विरोधक आपसुकच सत्ताधाऱ्यांना मदत करीत असल्याचे चित्र आहे. 

निष्ठावंत नागवडे यांच्यासोबतच.... 
कारखान्याचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे यांना मानणारे सगळेच कार्यकर्ते याही निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांच्यासोबत राहतील, अशी शक्‍यता आहे. नाराज कार्यकर्त्यांची मने वळविण्यात राजेंद्र नागवडे यांना यश आल्याचे बोलले जात असून, "बापूं'साठी कारखाना त्यांच्याच कुटुंबाच्या हाती ठेवण्यावर निष्ठावंत एकत्र असल्याचे दिसते आहे. 

राजकीय चर्चा नाही 
काष्टीत आम्ही बसलो होतो; मात्र त्यात राजकीय चर्चा नव्हती. कारखाना निवडणुकीबाबत अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. 
- दत्तात्रेय पानसरे, संचालक, जिल्हा सहकारी बॅंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pansere, Nahata's secret encounter with Nagavde