आम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..!

अंकुश चव्हाण
सोमवार, 21 जानेवारी 2019

कलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला जागा भेटत नाही. समारंभात आम्ही साधे वाढपी म्हणूनही चालत नाही. मग, जगायचं तरी कसं? या वेदना आहेत, खटाव- माणमधील पारधी समाजाच्या. 

कलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला जागा भेटत नाही. समारंभात आम्ही साधे वाढपी म्हणूनही चालत नाही. मग, जगायचं तरी कसं? या वेदना आहेत, खटाव- माणमधील पारधी समाजाच्या. 

आदिवासी-पारधी महिला संघटनेच्या अध्यक्षा राणी शिंदे ‘सकाळ’शी बोलत होत्या. पारधी समाज आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. समाजाच्या उत्थानासाठी राणी शिंदे व काश्‍मीर शिंदे धडपडतात. आमच्याकडे चांगल्या नजरेने कोणीच बघत नाही. काही करा, वा करू नका, पोलिसांचा ससेमिरा असतोच. ज्या परिसरात वास्तव्य करतो, तेथे काही घडल्यास पोलिस आम्हाला वेठीस धरतात. खरे गुन्हेगार नामानिराळेच राहतात. आम्हाला कोणाचा ना आधार, ना आश्रय. त्यामुळे चौकशी न करताच विविध आरोपांखाली जेलमध्ये टाकण्यात येते. तेथे न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागते.

कुटुंबातील पुरुष मंडळी तुरुगांत गेल्यानंतर घरगाडा चालवणे तर अवघड असते. त्यासाठी समाजातील एखाद्या सावकाराच्या मुलासोबत मुलीचे लग्न लावून देण्याच्या बोलीवर उसनवारी करावी लागते. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही लाजीरवाणी गोष्ट नाही काय? 
आजही चरितार्थासाठी समाजाला हक्काचा व्यवसाय नाही. ९० टक्के  लोकांना राहण्यास जागाच नाही. कित्येक कुटुंबे गावाजवळ पडकात, गायरानात राहतात. 

आजवर खटावमध्ये एक, दहिवडीतील नऊ अशा दहा लोकांना घरकुले मिळाली आहेत. इतरांचा जागेचा प्रश्न सुटला नाही. वडूजला समाजबांधवांना अर्धा-अर्धा गुंठा जागा मिळाली. परंतु, तीही मुस्लिम दफन भूमीलगत.
खटाव-माणमध्ये सिद्धेश्वर कुरोली, गोपूज, वडूज, कातरखटाव, बोंबाळे, तडवळे, कटगुण, भांडेवाडी, पुसेगाव, खातगुण, विसापूर, वर्धनगड, दरूज, जांब, कोकराळे, नेर, बुध, ललगुण, डिस्कळ, दहिवडी, मोगराळे, खटाव येथे पारधी समाज आहे. दोन-अडीचशे कुटुंबांची एकूण ५०० लोकसंख्या आहे. २० ते २५ जण सुशिक्षित झालेले आहेत. चार जण पदवीधर झाले आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमात वाढप्याचे कामही मिळत नाही. मयत व्यक्तीच्या दफनविधीला जागा मिळत नाही, हे सांगताना राणी शिंदेंना अश्रू अनावर झाले.

समाज मागास, अशिक्षित राहिल्याने त्यांना जागा व घरकुलांसह शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
- राणी शिंदे, अध्यक्षा, आदिवासी-पारधी महिला संघटना

Web Title: Pardhi Society Condition Life