ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोधला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

शैलेश चव्हाणचे धाडस; पोलिसांच्या मदतीने राबवली शोधमोहीम
परळी - ड्रोन कॅमेऱ्यातील आपले कसब पणाला लावत आणि सामाजिक भान जपत अडचणीतील लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे काम शैलेश रघुनाथ चव्हाण या युवकाने केले आहे. तीन दिवस झाले तरी उरमोडीच्या पुरात वाहून गेलेल्या शिकलगार यांचा मृतदेह सापडत नसल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना त्यांचे अखेरचे दर्शन घडविण्याचे काम या युवकाने केले. सामाजिक कामात विनामोबदला योगदान देण्याचा त्याचा मानस कौतुकास्पद आहे. 

एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला शैलेश चव्हाण हा एक वेगळ्या धाटणीचा युवक. व्यावसायिकता सांभाळताना सामाजिक भान जपणारा, सर्वांप्रती आदर राखणारा आणि एकही व्यक्ती नाराज होता कामा नये, असा स्थायीभाव असलेला हा युवक. नागठाणे येथील दिलावर शिकलगार हे २२ जून रोजी उरमोडी नदीत पुराच्या पाण्यात पडून वाहून गेले. त्यानंतर तीन दिवस त्यांचा शोध सुरू होता. मात्र, जोरदार पाऊस आणि पुराच्या पाण्याचा जोर यामुळे तिथे कोणताच उपाय चालत नव्हता. त्यामुळे नागठाणे ग्रामस्थांनी शैलेशशी संपर्क केला. परिस्थिती समजताच तो क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोचला. तेथील स्थितीची पाहणी करून बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मदतीने त्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. 

नदीचा वेगवान प्रवाह, पावसामुळे पुढील काहीच दिसत नसताना आणि ड्रोन चालविणे अवघड असतानाही शैलेशने धोका पत्करत नदीपात्रात आणि काठावरच्या दाट झाडीमध्येही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधमोहीम सुरूच ठेवली. ज्या ठिकाणी सर्व मानवी प्रयत्न हतबल ठरतात, त्यावेळी शैलेशसारखा तरुण तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्‍य बाबही शक्‍य करण्याचा प्रयत्न करतो. ड्रोन चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याने हे धाडस दाखविले. दुपारी सुरू झालेली शोधमोहीम संध्याकाळी संपली ती शिकलगार यांचा मृतदेह शोधल्यानंतरच.

शैलेशचे सर्वांकडून कौतुक
शोध मोहिमेदरम्यान शैलेशने अनेक अडचणींचा सामना केला. मात्र, आत्मविश्वास आणि धोका पत्करण्याची तयारी असल्यामुळेच शिकलगार यांच्या कुटुंबीयांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले. सामाजिक कामात आणि अडचणीच्या वेळी कोणत्याही मोबदल्याशिवाय स्वतः जोखीम पत्करून इतरांना समाधान देणारा शैलेश चव्हाण हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.

Web Title: parli news death body searching by dron camera