"जमाई राजां'मुळे काश्‍मिरात फुटीरतावाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

""जम्मू-काश्‍मीरमध्ये 70 ते 80च्या दशकात सीमेपलीकडून झालेल्या "रोटी-बेटी' व्यवहारामुळे आपल्याकडे आलेल्या "जमाई राजां'नी या प्रदेशात फुटीरतावादाची बीजे पेरली. त्याचा प्रत्यक्ष उद्रेक 1986मधील बॉम्बस्फोटानंतर झाला. त्या वेळी तेथील माता आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडल्याची जाणीव झाली,'' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. 

संगमनेर: ""जम्मू-काश्‍मीरमध्ये 70 ते 80च्या दशकात सीमेपलीकडून झालेल्या "रोटी-बेटी' व्यवहारामुळे आपल्याकडे आलेल्या "जमाई राजां'नी या प्रदेशात फुटीरतावादाची बीजे पेरली. त्याचा प्रत्यक्ष उद्रेक 1986मधील बॉम्बस्फोटानंतर झाला. त्या वेळी तेथील माता आपल्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडल्याची जाणीव झाली,'' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. 

भारतीय व पाश्‍चिमात्य स्त्रियांच्या मातृत्वाच्या तौलनिक अभ्यासासाठी "मदर्स ऑन व्हील्स' प्रकल्पांतर्गत, चार महिलांनी कारमधून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत 60 दिवसांत, 21 देशांतून केलेला 23 हजार 657 किलोमीटरचा चित्तथरारक प्रवास सहस्रबुद्धे यांनी मांडला. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प सहस्रबुद्धे यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी डॉ. संजय मेहता होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश कटारिया उपस्थित होते. 

सहस्रबुद्धे म्हणाल्या, ""आशियायी मुस्लिम राष्ट्रांतील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी "मातृत्वाचा शोध घेताना' संकल्पनेचा उदय झाला. त्याअंतर्गत दक्षिण-पूर्व देशांचा दौरा "मदर्स ऑन व्हील्स' या प्रकल्पांतर्गत काढला. जवळपास 21 देशांत स्वतःच्या कारने चार महिलांनी फिरण्याचे धाडस सोपे नव्हते. आंतररराष्ट्रीय निर्बंध, नियम व अटींमुळे त्यांना नेपाळमार्गे प्रवास करावा लागला.'' 
कारने 21 देशांतून, 60 दिवसांत 23 हजार 657 किलोमीटरचा चित्तथरारक प्रवास त्यांनी केला. या दरम्यान 30 ठिकाणी सुमारे 700 ते 800 महिलांशी त्यांनी चर्चा केली. संसाराच्या रथाचे एक भक्कम चाक असलेली स्त्री बहुपेढी व्यक्तिमत्त्व असते. भारतातील विवाह, मुलांवरील सोळा संस्कार, धर्म, याबाबत पाश्‍चात्त्य देशांतील महिला व युवकांना मोठे कुतूहल असल्याचे त्या म्हणाल्या. 

"वसुधैव कुटुंबकम' संकल्पना रुजावी 

प्रवासादरम्यान चीनमध्ये सर्वांत वाईट अनुभव आला, तर अल्माटी येथील हॉटेलपर्यंत पोचविण्यासाठी एका युवकाने 290 किलोमीटरचा प्रवास केल्याचा सुखद अनुभवही सहस्रबुद्धे यांनी सांगितला. 
"मातृत्व जाणून घेताना' या विषयावर येत्या शुक्रवारी (ता. 15) भारतात परिषद होत असून, त्यासाठी मध्य-पूर्व आशियातील 32 माता भारतातील कुटुंबव्यवस्था जाणून घेण्यासाठी येत आहेत. आपल्याकडील "वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना त्यांना त्यांच्या देशात नेता येईल, असे सहस्रबुद्धे यांनी नमूद केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Partisanism in Kashmir due to "Jamai Kings"