पक्षविरोधी काम करणाऱ्यांना घरी बसवा - शरद पवार

पक्षविरोधी काम करणाऱ्यांना घरी बसवा - शरद पवार

सातारा - विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा व सांगलीकरांचा प्रसाद घेऊन पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केलेल्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घरी बसवा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेंद्रे येथील मेळाव्यात आज दिला. दरम्यान, नोटाबंदीनंतर "रोहयो'च्या कामांवर जाणाऱ्या मजुरांची संख्या 86 लाख इतकी झाल्याचे ग्रामविकास मंत्रालयाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले.

अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. श्री. पवार यांच्या हस्ते कारखाना डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅंटचे आधुनिकीकरण आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, सुभाष शिंदे उपस्थित होते. पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

साखर उद्योग अडचणीत असताना केवळ नेतृत्व चांगले असले तर सभासदांना न्याय देता येऊ शकतो, हे शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवून दिले आहे, असे स्पष्ट करून श्री. पवार म्हणाले, 'काळा पैसा आहे, पण तो बाहेर काढण्याचे मार्ग वेगळे आहेत. तमाम जनता रांगेत उभी केली; पण मोदी सरकारला काळा पैसा निघाला किती? 77 हजार कोटी रुपये ही काळ्या पैशाची रक्कम आहे. मागील दोन वर्षांत रोजगार हमी योजनेच्या कामावर 30 लाख मजूर येत होते. पण, नोटाबंदीनंतर त्यांची संख्या 86 लाखांवर गेली आहे. गरीब माणसाचे जीवन उद्‌ध्वस्त करण्याचे काम नोटाबंदीने केले. बॅंका ठप्प झाल्या आहेत. केवळ दारू विक्रेत्यांचा धंदा वाढला आहे. यावेळच्या निवडणुकीत आता पैसेच नाहीत, हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद लढण्याची तयारी सर्वांनी केली पाहिजे. ही निवडणूक आपण जिंकूच.''

श्री. पवार म्हणाले, 'सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा निकाल ऐकून अस्वस्थ वाटले. हक्काची मते असूनही शेखर गोरेंना पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक जिंकलेले सांगलीकर आमच्या जवळचे आहेत. तसेच "रयत'मध्येही आमच्या सोबत आहेत. या धक्‍क्‍याबाबत खोलात जाऊन मी माहिती घेतली. सांगलीकरांच्या विद्यापीठातील एका प्राध्यापकाने मला दोन्ही बाजूंची यादी दिली. ही यादी जिल्हा परिषद व पालिका सदस्यांची होती. यादीत कंसात कोणी मूठभर, वाटीभर, पसाभर प्रसाद घेतल्याचे लिहिले होते. यातील काहींची नावे आमच्या सोबत असलेल्यांची होती. कदाचित प्रसादाला भुलून त्यांनी हे केले असेल. दोन दिवसांपूर्वी या यादीतील एकजण मुंबईला माझ्याकडे आले होते. म्हटले बोला काय काम आहे, त्यावर जिल्हा परिषदेचे तिकीट मागायला आलोय असे सांगितले. पण, तुमचे नाव प्रसादाच्या यादीत आहे, असे म्हणताच ते थरथर कापायला लागले. तुम्ही दोन्ही बाजूंकडून प्रसाद घेतला असेल, तर तो तेथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडे नेऊन पोच करा, मग तिकीट मागायला या, असा सल्ला त्यांना दिला.''

पक्षाच्या भवितव्याचा विचार न करता पैसे घेऊन वेगळा निर्णय घेणारा कार्यकर्ता यापुढे पक्षात चालणार नाही. शेखर गोरेंच्या निवडणुकीत जो ठपका बसला आहे, तो धुऊन काढायचा आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीरांच्या जिल्ह्यात त्यांच्या विचाराचे नेतृत्व घडविण्याचे काम केले तेथे असे व्हावे, हे दुर्दैव आहे. हे दुरुस्त करायचे असेल तर गरिबातील गरीब कार्यकर्ता उभा करून निवडून द्यायची तयारी ठेवा, असा सल्ला श्री. पवार यांनी दिला.

कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ऍड. नितीन भोसले, सरचिटणीस राजकुमार पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सचिन बेलागडे, सुधीर धुमाळ, ऋषिकांत शिंदे, किरण साबळे-पाटील, राजू भोसले, शफिक शेख, राजेंद्र लावंगरे, फिरोज पठाण, बाजार समिती सभापती विक्रम पवार, बाळासाहेब महामुलकर, समिंद्रा जाधव आदी उपस्थित होते.

खाली बसविण्याचे काम रामराजेंवर...
'रामराजे तुम्ही कमी बोलता, मला ते जाणवत नाही. एरव्ही सभापतीला कमी बोलावे लागते. विधान परिषदेत जास्त बोलणाऱ्याला सभापतीच खाली बसवितात. आता तुम्ही स्वत:च हा अधिकार घेऊन जिल्ह्यात जास्त बोलणाऱ्यांना खाली बसविण्याची भूमिका पार पाडावी. हे काम तुम्ही उत्तम रितीने कराल,'' असे सांगत श्री. पवार यांनी आगामी निवडणुकीत जास्त बोलणाऱ्यांना घरी बसविण्याची जबाबदारी रामराजेंच्या गळ्यात घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com