शिराळा, इस्लामपूर आगाराबद्दल संताप ; कऱ्हाड दक्षिणेतील प्रवाशांना हवी बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शिराळा, इस्लामपूर या दोन्ही आगारांनी ज्या दोन बस येणपेपर्यंत सुरू आहेत. त्या दोन्ही बस उंडाळेपर्यंत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

उंडाळे ः कऱ्हाड दक्षिण विभागातील प्रवाशांनी मागणी करूनही शिराळा व इस्लामपूर आगाराच्या बस अद्याप सुरू न केल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. या बस येणपेपर्यंत येतात. या सर्व बस कऱ्हाड दक्षिण विभागातील मध्यवर्ती केंद्र असलेल्या उंडाळेपर्यंत पुढे सुरू कराव्यात म्हणजे प्रवाशांची सोय व एसटीचे उत्पन्नही वाढेल, अशी मागणी या विभागातील प्रवासी व ग्रामस्थांतून होत आहे.
 

कऱ्हाड दक्षिण विभागातील मध्यवर्ती केंद्र म्हणून उंडाळे ओळखले जाते. या डोंगरी भागात सर्व सुविधा असल्याने सर्वांची या ठिकाणी ये-जा असते. पण, या ठिकाणाहून शिराळा अथवा इस्लामपूर येथे जाण्यासाठी बसची सोय नाही. त्यासाठी प्रवाशांना कऱ्हाडवरून पेठनाका, इस्लामपूर मार्गाने इकडे जावे लागते किंवा शेडगेवाडी फाटा यामार्गे शिराळा किंवा इस्लामपूर येथे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा खर्च होतो. याचा विचार करून इस्लामपूर किंवा शिराळा आगाराने या विभागात येणपे गिरजवडे किंवा साळशिरंबे पाचुंब्री वाटेगाव या मधल्यामार्गे जर बस सुरू केल्या तर या विभागातील लोकांची मोठी सोय होईल व एसटीचे उत्पन्न वाढेल. इस्लामपूर, शिराळा येथून दोन बस येणपेपर्यंत धावतात.

या बसच्या वेळा सकाळ-दुपार असून, याच बस तशाच येणपेपासून पुढे पाच ते सात किलोमीटर असलेल्या उंडाळेपर्यंत सुरू केल्या तर या विभागातील लोकांची शिराळा, इस्लामपूर येथे जाण्याची सोय होईल. प्रवाशांची गेरसोय टळून उत्पन्नातही वाढ होईल व अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसेल. येणपे-उंडाळे मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध खासगी वडाप सेवा सुरू असून, या बस सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा कल एसटीकडे वाढेल व प्रवाशांची सोय होईल याचा विचार करून शिराळा, इस्लामपूर या दोन्ही आगारांनी ज्या दोन बस येणपेपर्यंत सुरू आहेत, त्या दोन्ही बस उंडाळेपर्यंत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers anger over Shirala and Islampur bus depot