"शिवशाही' बसकडे प्रवाशांची पाठ ! 

संजय साळुंखे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

साध्या बसच्या तुलनेत "शिवशाही' बस ही सध्याच्या स्थितीत तोट्यात आहे, असेच दिसते. तरीही सातारा - पुणे बससेवेसाठी शिवशाहीचा अट्टाहास हाेत आहे.

सातारा  ः आरामदायी प्रवासासाठी या गोंडस वाक्‍यातून "शिवशाही' बससेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र, अगदी पहिल्या दिवसापासूनच या सेवेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला नाही. जादा तिकीट दर, अप्रशिक्षित चालक व अन्य सुविधांचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. "शिवशाही'ला अपेक्षित प्रतिसाद नसला, तरीही सातारा- पुणे विनाथांबाच्या जादा फेऱ्या वाढवून ही सेवा प्रवाशांच्या गळी उतरवण्याचा प्रकार सुरू आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमुळे खेड्यापाड्यातील प्रवाशांची सोय झाली. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या सवलती व अन्य कारणांमुळे सातत्याने महामंडळ तोट्यात राहिल्याचे बोलले जाते. त्यातून महांडळाच्या खासगीकरणाची चर्चाही अनेकदा रंगली; पण कामगारांच्या तीव्र विरोधामुळे खासगीकरणाचा डाव फसला. मात्र, "शिवशाही'च्या माध्यमातून खासगीकरणाचे एक पाऊल टाकण्यात आलेच.

हेही वाचा - पुणेकरांसह सातारकरांच्या खिशावर अतिरिक्त भार

"वरिष्ठां'च्या दबावामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचाही नाइलाज

"शिवशाही'तून प्रवास म्हणजे आरामदायी प्रवास, अशीच जाहिरात महामंडळाने केली. पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी "शिवशाही' बस सोडण्यात आल्या. त्यानंतर दोन- तीन तासांच्या प्रवासासाठीही या बस घुसडण्यात आल्या. "वरिष्ठां'च्या आदेशानुसार साध्या बस (लालपरी) कमी करून त्याऐवजी "शिवशाही'चा पर्याय देण्यात आला. आता या सेवेचा आणखी विस्तार वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. "वरिष्ठां'च्या दबावामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचाही नाइलाज झालेला दिसतो.
 
प्रवाशांतूनही वाढता विरोध आहे

तसे पाहिले तर पहिल्या दिवसापासूनच "शिवशाही'ला प्रवाशांनी प्रतिसाद दिला नाही. अप्रशिक्षित चालक, मोडक्‍या सीटस्‌ व सदोष वातानुकूलित यंत्रणा आदींमुळे प्रवाशांनी "शिवशाही'पासून दोन हात लांब राहणेच पसंत केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या किंवा तातडीची गरज असलेल्या प्रवाशांनीच या सेवेतून प्रवास केला. "शिवशाही'ला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिकीट दर. साध्या बससेवेपेक्षा जादा तिकीट दर असल्याने प्रवाशांनी कायम "लालपरी'लाच पसंती दिली. सातारा-पुणे विनावाहक-विनाथांबा बससेवेचीही हीच स्थिती आहे.

हेही वाचा - शिवशाहीतून प्रवाशांची पाकीटमारी

या दोन्ही सेवांच्या तिकीट दरात 65 रुपयांचा फरक आहे. त्यातून "शिवशाही'मुळे प्रत्येक फेरीमागे प्रवाशांचे 2 हजार 795 रुपये जादा द्यावे लागत आहेत. महिन्याचा हा आकडा 13 लाख 86 हजार रुपयांवर जातो. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत असतानाही "शिवशाही'च्या आणखी फेऱ्या वाढवण्याचा डाव आखला जात आहे. त्याला प्रवाशांतूनही वाढता विरोध आहे.
 
"शिवशाही' ऐवजी साध्या बस सोडल्यास उत्पन्नात भर

साध्या बसच्या तुलनेत "शिवशाही' बस ही सध्याच्या स्थितीत तोट्यात आहे, असेच दिसते. एसटी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी दररोज 56 फेऱ्या सोडल्या जातात. त्यात साध्या बस व "शिवशाही'च्या प्रत्येकी 28 फेऱ्यांचा समावेश आहे. सध्याच्या उत्पन्नाचा विचार केला, तर "शिवशाही'पेक्षा साध्या बसमधून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. प्रवासी भारमानही जास्त आहे. सातारा-पुणेच्या साध्या बसच्या प्रत्येक फेरीत सरासरी 40 प्रवासी प्रवास करतात.

हेही वाचा - शिवशाहीचा आरामदायी नव्हे...त्रासदायक प्रवास

"शिवशाही'चा हा आकडा सरासरी 25 ते 28 प्रवाशांच्या दरम्यान आहे. याचा अर्थ दोन्ही बसच्या प्रत्येक फेरीमागे 15 प्रवाशांचा फरक आहे. "शिवशाही'ऐवजी साध्या बस सोडल्यास महामंडळाच्या उत्पन्नात आणखी भर पडू शकते. मात्र, या फायद्याच्या गणिताकडे खासगीकरणाच्या डावात कुणीही लक्ष देत नाही. प्रवाशांकडून प्रतिसाद नसताना, प्रवासी भारमान कमी असल्याने तोट्यात असतानाही "शिवशाही'चा जादा फेऱ्यांचा डोस प्रवाशांसाठी मारकच आहे.

गणित... फायदे-तोट्याचे  ! 
साध्या बसचा तिकीट दर- 135 
"शिवशाही' बसचा तिकीट दर- 200 
साध्या बसचे सध्याचे प्रवासी भारमान- 40 
"शिवशाही' बसचे सध्याचे प्रवासी भारमान- 25 ते 28

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers Are Not Willing To Travel From 'Shivshahi' Bus