‘माणूस तेथे पासपोर्ट’ सुविधा उभी करू - ज्ञानेश्‍वर मुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

कोल्हापूर - परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्त आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुलभ व तितकीच गतिशील केली जात आहे. यात पोलिस व्हेरिफिकेशन काही राज्यांत तीन ते चार दिवसांत मिळते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात असे व्हेरिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल; तसेच जिल्हावार पासपोर्ट कार्यालय स्थापन करून माणूस तेथे पासपोर्ट अशी व्यवस्था देशात उभी केली जाईल,’’ असे मत परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज येथे व्यक्त केले. 

कोल्हापूर - परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्त आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुलभ व तितकीच गतिशील केली जात आहे. यात पोलिस व्हेरिफिकेशन काही राज्यांत तीन ते चार दिवसांत मिळते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात असे व्हेरिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल; तसेच जिल्हावार पासपोर्ट कार्यालय स्थापन करून माणूस तेथे पासपोर्ट अशी व्यवस्था देशात उभी केली जाईल,’’ असे मत परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज येथे व्यक्त केले. 

रमणमळा येथील मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. त्याचे उद्‌घाटन श्री. मुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. 
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर हसीना फरास, जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी प्रमुख उपस्थित होते. 

मुळे म्हणाले, ‘‘पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड जसे महत्त्वाचे आहे; तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आहे त्या व्यक्तीचे परदेशी जाणे-येणे सुखकर व्हावे, अशी लिखित ग्वाही त्यात राष्ट्रपतींनी दिलेली असते. म्हणून परदेशात पासपोर्टचे महत्त्व अधिक आहे. जगातील १९५ देशांत ऑनलाइन व्हिसा देण्याची सुविधा आहे, तेथील नियम सोपे आहेत. त्यामुळे आपले कोणी परिचित परदेशात असतील तर त्यांना तेथील दूतावास कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही. देशभरात पूर्वी ९० पासपोर्ट कार्यालये होती त्यांची संख्या वाढविण्यात येत असून यापुढे जिल्हावार पासपोर्ट सुविधा दिली जाईल. त्यासाठी टपाल खात्याने आपल्याच कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हे काम सोपे झाले आहे.’’

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘‘पासपोर्ट ऑनलाइन प्रक्रिया सुलभ व्हावी; तसेच आंदोलनातील गुन्हे दाखल असलेल्यांना पासपोर्ट मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी तिन्ही खासदारांनी संसदीय मार्गाने प्रयत्न करावेत.’’ 

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘कृषी, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रांत कोल्हापूर देशातील आघाडीचा जिल्हा आहे. येथे परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशात पासपोर्ट कार्यालय पुण्यात गेल्याने येथे गैरसोय झाली. त्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र येथे सुरू होणे ही काळाची गरज होती. ’’ 

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘जनतेच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलने होतात. यात सविनय कायदेभंग स्वरूपाच्या केसेस दाखल होतात. त्यांचा संदर्भ घेत पोलिस दाखला दिला जात नाही. त्यामुळे पासपोर्ट मिळण्यास अडथळा येतो. आंदोलनात केस झाली म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगार नव्हे. ज्यांच्यावर किरकोळ गुन्हे, आंदोलनातील गुन्हे आहेत, त्यांच्या केसेस पासपोर्ट मिळविण्यासाठी अडथळा ठरू नयेत.’’ 

खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आम्ही तीन खासदार एकत्र येऊन राजकारणविरहित कोल्हापूरच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू. विकासाचे महत्त्वाचे पाऊल म्हणून पासपोर्ट सुविधेकडे पाहिले पाहिजे. परदेशी जाणे-येणे वाढल्यास येथील विकासाला गती मिळणार आहे. मात्र पासपोर्ट सेवेत असलेली एजंटविरहित सेवा व्हावी यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.’’ केंद्राचे उद्‌घाटन होताच केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अवघ्या दहा मिनिटांत पासपोर्ट काढला गेल्याचे जाहीर केले. महापौर श्रीमती फरास यांनी या सुविधेचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन केले. टपाल विभागाचे पोस्ट मास्तर जनरल विनोदकुमार वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. पासपोर्ट विभागीय अधिकारी अतुल बोटसुर्वे यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

आश्‍वासनपूर्ती 
पासपोर्टची सेवा उपलब्ध करून देणार, असे निवडणुकीत सांगितले होते. त्याची पूर्ती आज होत आहे. पासपोर्ट कार्यालय कोल्हापुरात सुरू व्हावे यासाठी सहा वेळा परपराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. ठोस पाठपुरावा केला. यातच ज्ञानेश्‍वर मुळे यांचीही येथे सचिवपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्रात प्रथमच पासपोर्ट कार्यालय सुरू होण्याचा मान कोल्हापूरला मिळाला, असे खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.

अशा आहेत सुविधा
दीड हजार रुपयांत पासपोर्ट  
एजंटाशिवाय काढता येईल पासपोर्ट 
कोल्हापूर कार्यालयात दिवसाला २०० पासपोर्ट देण्याची क्षमता 
पासपोर्ट अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सुरू होणार 
शंभर रुपयांत अर्ज भरून देण्याची सुविधा असेल
पासपोर्ट काढताना घटस्फोटित व्यक्तीला जोडीदाराचे नाव लिहिण्याची गरज नाही 

अनाथांना त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्थेचे अथवा व्यक्तींच्या दाखल्यावरही पासपोर्ट

Web Title: passport facility