पासपोर्ट कार्यालयाचे एप्रिलला उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

सोलापूरसह सांगली, उस्मानाबाद, लातूर व बीडची होणार सोय

सोलापूर - होणार होणार म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चर्चा होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्‌घाटनाला एप्रिलचा मुहूर्त मिळाला आहे. सध्या या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

सोलापूरसह सांगली, उस्मानाबाद, लातूर व बीडची होणार सोय

सोलापूर - होणार होणार म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चर्चा होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्‌घाटनाला एप्रिलचा मुहूर्त मिळाला आहे. सध्या या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकणाऱ्या सोलापूर शहरात काही महिन्यांपूर्वी पासपोर्ट सेवा लघु केंद्राची सुरवात करण्यात आली. महापालिका आणि विभागीय पासपोर्ट कार्यालय यांच्यात भाडेकरार होऊन रिपन हॉलची इमारत पासपोर्ट कार्यालयासाठी देण्यात आली आहे. सुमारे १२ हजार चौरस फूट जागेत हे कार्यालय होत आहे. त्यापैकी चार हजार चौरस फूट जागेत जुने सभागृह, एक हजारात नवीन बांधकाम, दोनशे रनिंग मीटर परिसराच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरू असून, मार्चअखेर ते पूर्ण झाल्यानंतर ते पासपोर्ट कार्यालयाकडे सुपूर्त करणार आहे. 

संपूर्ण भारतात केवळ चारच लघु पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे. या केंद्रात सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, सांगली व लातूर या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी होईल. ती सहायक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे जाईल.

किमान आठ दिवसांत नागरिकांना पासपोर्ट मिळण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूरनंतर सोलापूरला हे पासपोर्ट सेवा केंद्र मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. पासपोर्ट काढण्यासाठी सोलापुरातील हजारो नागरिकांना पुण्याला जावे लागते. आता हे केंद्र शहरातच होत असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. 
 

पुणे कार्यालयावरील ताण होईल कमी
पासपोर्ट काढण्याकडे लोकांचा वाढता कल आणि एकूण संख्या यांचा विचार करता महाराष्ट्रात जास्तीत जास्त पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यावर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार सोलापुरात नव्याने पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयामुळे पुणे विभागातील मुख्य कार्यालयावरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे. 

सोलापुरातील रिपन हॉलमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते आमच्याकडे हस्तांतरित होईल. १५ एप्रिलच्या आसपास या केंद्राचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे.
- अतुल गोतसुर्वे, विभागीय पासपोर्ट अधिकारी, पुणे

Web Title: passport office inaugurated in april