कोयना धरणातून पाणी सोडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

'कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिन्यांत सुमारे नऊ हजार 391 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे निर्धारित वेळेपेक्षा आधीच उघडावे लागले. कालपासून पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीही सुरू केली आहे.''
- ज्ञानेश्‍वर बागडे, कार्यकारी अभियंता

एकूण 11 हजार 792 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; सावधानतेचा इशारा
पाटण - राज्याची वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणातून आज सकाळी अकरा वाजता पाणी सोडण्यात आले. धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून 9,626 क्‍युसेक व पायथा वीज गृहातून 2,166 क्‍युसेक असे एकूण 11 हजार 792 क्‍युसेक पाणी कोयना नदीत सोडण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्‍यात 12, तर सांगली जिल्ह्यात 28 तासांनी हे पाणी पोचणार आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात येणाऱ्या पाण्याने एक ऑगस्टसाठी आवश्‍यक निर्धारित पाणीपातळी तीन दिवस आधीच गाठली आहे. त्यामुळे पाण्याच्या नियंत्रणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर बागडे यांनी दिली. सध्या जलाशयाची पाणीपातळी दोन हजार 144.8 फूट आहे, तर पाणीसाठा 83.13 टीएमसी आहे. एक जून रोजी धरणात 18.51 टीएमसी पाणीसाठा होता. जून व जुलै महिन्यांत पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणात 71.39 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यापैकी 4.83 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वापरण्यात आले. 1.77 टीएमसी पाणी वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रात सरासरी 3,290 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे पाऊसमान मागील वर्षापेक्षा सरासरी 27 टक्‍क्‍यांनी जादा आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे यंदा प्रथमच जुलैमध्येच पाणी सोडण्यात आले. श्री. बागडे म्हणाले, 'पाणी सोडल्याने कोयना व कृष्णा नदीची पाणीपातळी वाढणार आहे. कोणाला धोका पोचू नये, म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.''

दरम्यान, गेल्या 24 तासांत कोयनानगरला 42, नवजा येथे 82, तर महाबळेश्‍वरला 56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस मंदावला असला, तरी 18 हजार 97 क्‍युसेक पाण्याची आवक जलाशयात होत आहे.

धरणाच्या वक्र दरवाजांतून पाणी सोडले, त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर बागडे, उपविभागीय अधिकारी एस. एम. चव्हाण, आर. बी. जमाते उपस्थित होते. 

Web Title: patan news water release in koyana dam