नगरसेवकांच्या दुफळीत सुविधांची दैना!

नगरसेवकांच्या दुफळीत सुविधांची दैना!

पाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर नगरपंचायतीला आणण्याचे काम करावे लागणार आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सहा महिने झाले, तरी प्रशासनाचा गाढा अजून रुळावर आलेला दिसत नाही. ग्रामपंचायतीच्या कारभारातून नगरपंचायत व्यवस्थापनात आलोय याचा ताळमेळ नगरसेवकांत नाही. १५ विरुद्ध दोन असा राष्ट्रवादीला एकतर्फी विजय मिळाला असला, तरी सहा महिन्यांत एकाही विकासकामाची सुरवात झालेली नाही. 

मुख्याधिकारी रजेवर
मुख्याधिकारी अक्षयकुमार करमळकर हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्याने संपूर्ण प्रशासन ठप्प झालेले दिसते. मुख्याधिकारी रजेवर का गेले याबाबत शहरात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. मलकापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याकडे पाटणचा अतिरिक्त पदभार दिला असला, तरी कऱ्हाड नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या वादामुळे तो कारभारही त्यांनाच पाहावा लागत आहे. दळवी यांचे यांचे सासर पाटण असले, तरी कऱ्हाड व मलकापुरातील कामकाज पाहून त्यांना पाटणसाठी किती वेळ मिळतो, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाचे सेनापती नसल्याने सैन्याची अवस्था फार बिकट पाहावयास मिळते. थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकारी लक्ष घालतात, यावरून वस्तुस्थिती लक्षात येते. 

नगरसेवकांमध्ये गट-तट
प्रशासनाचा हा इतिहास सर्वांसमोर असताना नगरसेवकांमध्ये निर्माण झालेली दुफळी सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. दोन गटांत विभागणी झालेले नगरसेवक व एकमेकांवर चाललेली कुरघोडी बघण्यापलीकडे विरोधी दोन सदस्य काही करताना दिसत नाहीत.  

नगरसेविकांचा नगरपंचायतीत सहा महिन्यांत कमी सहभाग दिसतो. मात्र, त्यांचे पतिराज सकाळपासूनच नगरपंचायतीत ठिय्या मारून कामकाजात ढवळाढवळ करताना दिसतात. काही नगरसेवक व नगरसेविकांचे पतिराज हे दररोज एका शिकवणी वर्गाला जातीने हजर दिसतात. मिळालेल्या मार्गदर्शनातून कुरघोड्यांना बळ मिळण्यापलीकडे काहीही घडत नाही. शिकवणी घेणारे मात्र शिकवणीला जाणाऱ्यांची खासगीत टिंगलटवाळी करतात, हेही समोर येत आहे.

नागरी सुविधांचा बोजवारा
शहरातील गटारे रस्त्यावर वाहतात. रिकामी जागा दिसेल तेथे कचरा टाकला जातो. दररोज अतिक्रमणांत होणारी वाढ व वाहतूक व्यवस्थेचा फज्जा याबाबत एकही नगरसेवक ब्र काढताना दिसत नाही. मासिक सभेत काय उजेड पडतो, हे चाललेल्या एकूण प्रशासनातून स्पष्ट होते.

सत्यजितसिंह पाटणकरांनी लक्ष घालण्याची गरज
हा चाललेला कारभार युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची सत्त्वपरीक्षा घेणारा आहे. नगरसेवकांना मलकापूर नगरपंचायतीचा अभ्यास दौरा करण्याबरोबर जनतेतही जागृती करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नगरसेवक व प्रशासनावर वचक ठेवण्याबरोबर अतिक्रमणे, वाहतूक व्यवस्था व थकबाकी वसुलीसाठी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

नगरसेवकांतील गटबाजी संपवण्यासाठी व शहराला विकासाभिमुख आणण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांना ‘दादागिरी’ करावी लागेल नाही, तर ग्रामपंचायत बरी होती, असेच म्हणण्याची वेळ जनतेवर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com