कॉंग्रेसमध्ये मतभेद नाहीत - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

सांगली - "कॉंग्रेसमध्ये जिल्हा परिषदेसाठी कोठेही फार टोकाचे मतभेद नाहीत. मिरज तालुक्‍यात काही ठिकाणी वाद असला तरी येथे निवडीसाठी प्रतीक पाटील आणि जयश्री पाटील यांची अधिकृत समिती आहे. त्यांनी दिलेली नावे, यादीवर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल,'' असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पतंगराव कदम यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, ""शेतकरी संघटनेशी चर्चा सुरू आहे.

सांगली - "कॉंग्रेसमध्ये जिल्हा परिषदेसाठी कोठेही फार टोकाचे मतभेद नाहीत. मिरज तालुक्‍यात काही ठिकाणी वाद असला तरी येथे निवडीसाठी प्रतीक पाटील आणि जयश्री पाटील यांची अधिकृत समिती आहे. त्यांनी दिलेली नावे, यादीवर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल,'' असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पतंगराव कदम यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, ""शेतकरी संघटनेशी चर्चा सुरू आहे.

स्थानिक स्तरावर आघाड्यांचा निर्णय झाल्यास त्याला जिल्हा समिती मान्यता देईल.'' 
मुंबईतील पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर आमदार पतंगराव कदम सांगलीत आले. मुंबईतील बैठकीत जिल्ह्यातील गटबाजी उफाळली असल्याचा इन्कार त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ""माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हा पार्लमेंटरी बोर्ड आहे. यामध्ये प्रतीक पाटील, सदाशिवराव पाटील, निरीक्षक प्रकाश सातपुते, मोहनराव कदम आहेत. आम्ही सर्व तालुक्‍यांची यादी एकमताने मान्य केली. मिरज तालुकाध्यक्षांनी नावे दिली, मात्र अहवाल दिला नाही. तेथे प्रतीक पाटील आणि जयश्री पाटील यांनी नावे सुचवली. काही नावांबाबत वाद झाल्यास तो माझ्याशी चर्चा करून सोडवायचा आहे. तो विषय चर्चेने सोडवू. खानापुरात एकमताने निर्णय घेतले. तेथे चौघांची समिती होती.'' 

आघाडीबाबत तालुक्‍यांना स्वातंत्र्य 
आघाड्यांबाबत आमदार कदम म्हणाले, ""आघाडीची चर्चा जिल्हास्तरावर नाही. भाजप, शिवसेनेशी आघाडी केल्यास उमेदवारांना एबी फॉर्म देणार नाही, असा निर्णय प्रदेश कॉंग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही घेतला आहे. स्थानिक स्तरावर समविचारी पक्षांशी आघाडीचा निर्णय घेतल्यास प्रदेश समितीशी बोलून त्याला जिल्हा समिती मान्यता देईल. खानापूर तालुक्‍यात एका मतदारसंघात आघाडी झाली आहे. शिराळ्यात राष्ट्रवादीशी आघाडी आहे. तेथे प्रत्येकी दोन जागांवर आघाडी होईल. जतमध्ये एका मतदारसंघात जनसुराज्यसोबत आघाडी आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडीत अजून निर्णय नाही. मात्र पलूस, कडेगावमध्ये शंभर टक्के कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीच अंतिम निर्णय होतील. कुणी कुणाशी आघाडी केली हे 13 तारखेलाच सगळे चित्र स्पष्ट होईल.'' 

विशाल पाटील यांचा संबंध काय? 
मिरज तालुक्‍यात विशाल पाटील राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यावर श्री. कदम म्हणाले, "" विशाल पाटील काय करत असतील तर त्यांचा निवडीबाबत संबंधच नाही. मिरजेची अधिकृत जबाबदारी प्रतीक पाटील आणि जयश्री पाटील यांच्याकडे होती. विशाल यांचा संबंध काय?'' 

भाजपची टेस्ट 
श्री. कदम म्हणाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची टेस्ट आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप क्रमांक एकवर होती. शहरी मतदारांचा प्रभाव होता; मात्र आता ग्रामीण मतदारांमध्ये त्यांची खरी टेस्ट आहे. नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस दोन नंबरवर होती. जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आमिषे दाखवून उमेदवार गोळा करण्याचे काम सुरू आहे.'' राष्ट्रवादीशी निवडणूक पूर्व आघाडी झालेली नाही; मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार का? यावर ते म्हणाले, ""निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते. सत्ता करताना डोकी मोजायची असतात.'' 

एबी फॉर्मची पोच घ्यावी 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांनी एबी फॉर्म जमा केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची पोच घेणे आवश्‍यक आहे. जमा केलेले फॉर्म गायब होण्याचे प्रकार घडत असल्याने हा पर्याय काढला आहे. 

सर्वपक्षीय विरोधाची सवयच 
पलूस, कडेगावमध्ये भाजप, राष्ट्रवादीची आघाडी झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "सर्वपक्षीय विरोधक माझ्याविरोधात एकत्र येणे नवीन नाही. गेली 30 वर्ष हा अनुभव आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी आघाडी नवीन नाही. त्याची भीतीही नाही. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही तालुक्‍यांत राष्ट्रवादी शून्य आहे. भाजपला कडेगावात थोड्या जागा मिळाल्या.'' 

Web Title: patangrao kadam talked about congress