ए भो, काय असती, धनगर घरकुल योजना

 Pathardikar ignorant of Dhangar Gharkul Yojana
Pathardikar ignorant of Dhangar Gharkul Yojana

पाथर्डी : धनगर समाजाला राज्यात दहा हजार घरे बांधून देण्याच्या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 31 जानेवारी आहे. समाजकल्याण विभागाने तसे लेखी आदेश पंचायत समित्यांना दिले आहेत. 26 जानेवारीच्या ग्रामसभेत लाभार्थी निवडीचे निर्णय घेऊन पंचायत समितीला प्रस्ताव पाठविण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, पाथर्डी पंचायत समितीला मात्र अद्याप तसा आदेश मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्‍यातील धनगर समाजाचे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

 6 नोव्हेंबर 2019 रोजी निघाला
धनगर समाजाच्या लोकांसाठी दहा हजार घरकुले बांधून देण्याच्या योजनेला 30 जुलै 2019 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. याबाबतचा शासन आदेश 6 नोव्हेंबर 2019 रोजी निघाला. सन 2019-20साठी दीडशे कोटी रुपयांची तरतूदही यासाठी करण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीबाबत समाजकल्याण विभागाने सर्व पंचायत समित्यांना 13 जानेवारी 2020 रोजी पत्र पाठविले आहे.

आम्हाला अद्याप कोणतेही पत्र नाही

पाथर्डी तालुक्‍यात अनेक लाभार्थींनी प्रस्ताव तयार केले आहेत. भूमिहीन असल्याचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जमा केली आहेत. लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यालयात चौकशीही करत आहेत. मात्र, "आम्हाला अद्याप कोणतेही पत्र नाही. पत्र आल्यानंतरच प्रस्ताव स्वीकारले जातील,' असे तेथील कर्मचारी सांगत आहेत. 

तांत्रिक माहिती वेळेत समजली नाही
धनगर समाजासाठी असलेल्या घरकुल योजनेची माहिती पंचायत समितीमध्ये मिळत नाही. सरकारच्या संकेतस्थळावर तर अंमलबजावणीही सुरू असल्याचे दिसते. नगर येथील समाजकल्याण विभागाचे अधिकारीही योजना सुरू असल्याचे सांगतात. पंचायत समितीमध्ये मात्र माहिती नसल्याचे सांगितले जाते. आम्ही प्रस्ताव तयार केला आहे. तांत्रिक माहिती वेळेत समजली नाही आणि प्रस्तावाला उशीर झाला, तर लाभापासून वंचित राहण्याची भीती वाटते. 
- राजेंद्र शिंदे, टाकळीमानूर, ता. पाथर्डी 

धनगर समाजाच्या घरकुल योजनेची माहिती अद्याप आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून आलेली नाही. माहिती मिळताच प्रस्ताव मागविण्यात येतील. त्या वेळी तशी प्रसिद्धी देऊन प्रस्ताव घेऊन, पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येईल. 
- सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाथर्डी 

"धनगर समाजाला घरकुल योजनेसाठी प्रस्ताव मागवावेत,' असे सर्व पंचायत समित्यांना 13 जानेवारी 2020 रोजी लेखी कळविले आहे. प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 31 जानेवारी 2020 आहे. मात्र, मुदत वाढवूनही देता येईल. पंचायत समित्यांनी वेळेत पात्र लाभार्थींच्या याद्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पाठवाव्यात. 
- पांडुरंग वाबळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com