महिन्यात 48 कोटी रूपये वीज बिल भरणा...एक लाख 79 हजार ग्राहकांकडून थकबाकी जमा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सांगली-  वाढीव वीज बिलाच्या तक्रारीबाबत महावितरणने खुलासा करून शंकांचे निरसन केल्यामुळे थकबाकी वसुली होण्यास मदत होऊ लागली आहे. जिल्ह्यात एक जून ते 6 जुलै या कालावधीत एक लाख 79 हजार 410 ग्राहकांनी 48 कोटी रूपये थकबाकी भरली आहे. त्यामध्ये भरणा केंद्रावर 24 कोटी 70 लाख तर ऑनलाईन 23 कोटी 38 लाख रूपये थकबाकी भरण्यात आली आहे. 

सांगली-  वाढीव वीज बिलाच्या तक्रारीबाबत महावितरणने खुलासा करून शंकांचे निरसन केल्यामुळे थकबाकी वसुली होण्यास मदत होऊ लागली आहे. जिल्ह्यात एक जून ते 6 जुलै या कालावधीत एक लाख 79 हजार 410 ग्राहकांनी 48 कोटी रूपये थकबाकी भरली आहे. त्यामध्ये भरणा केंद्रावर 24 कोटी 70 लाख तर ऑनलाईन 23 कोटी 38 लाख रूपये थकबाकी भरण्यात आली आहे. 

लॉकडाउन काळात वीज मिटर रिडिंग आणि बिल वाटप बंद होते. एप्रिल व मे महिन्यात वीज बिले सरासरी युनिटनुसार दिली होती. डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्यातील वीज वापरावर ही बिले दिली. परंतू हिवाळ्यात वापर कमी असतो. तर प्रत्यक्षात एप्रिल व मे महिना उन्हाळ्यातील असल्यामुळे तसेच लॉकडाउनमध्ये अनेकजण घरात असल्याने वापर जास्त होता. त्यामुळे जून महिन्याचे बिल वाढून आले. तसेच एक एप्रिलपासून चार्जेस वाढवल्यामुळे बिल वाढून आल्याचे दिसले. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढली. त्याचे निरसन करण्यासाठी ग्राहक मदत कक्ष स्थापन केला. विज बिलाची पडताळणी करण्यासाठी "लिंक' देण्यात आली.

अनेकांनी महावितरणच्या कार्यालयात रांग लावून शंकांचे निरसन करून घेतले. त्यातूनही समाधान न झाल्यास तक्रारीसाठी ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. महावितरणची लॉकडाउन काळात सांगली जिल्ह्यातील थकबाकी शंभर कोटीहून अधिक वाढली होती. महावितरणने ग्राहकांच्या तक्रारीबाबत उपाययोजना केल्यामुळे अनेकांनी बिले भरण्यास सुरवात केली आहे. तसेच एकरकमी बिल भरल्यानंतर दोन टक्के सवलतीचा लाभ देखील घेतला जात आहे. वीज बिल भरणा केंद्र सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील पाच विभागातील 84 हजार 170 ग्राहकांनी 24 कोटी 70 लाख रूपये भरणा केला आहे. तर 95 हजार 240 ग्राहकांनी ऑनलाईन 23 कोटी 38 लाख रूपये वीज बिल भरणा केला आहे. एकुण 1 लाख 79 हजार 410 ग्राहकांनी 48 कोटी 8 लाख रूपये एक जून ते 6 जुलै या कालावधीत भरले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paying electricity bill of Rs 48 crore IN month . arrears from one lakh 79 thousand customers