हिळ्ळीमध्ये गावकरी पाणी आणि वीज टंचाईने त्रस्त

राजशेखर चौधरी
सोमवार, 4 जून 2018

अक्कलकोट - हिळ्ळी ता.अक्कलकोट येथील भीमा नदी कोरडी पडली आहे. त्यातच विजेची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. यासाठी भीमा नदीत उजनीचे पाणी हिळ्ळीपर्यंत सोडावे आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

अक्कलकोट - हिळ्ळी ता.अक्कलकोट येथील भीमा नदी कोरडी पडली आहे. त्यातच विजेची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. यासाठी भीमा नदीत उजनीचे पाणी हिळ्ळीपर्यंत सोडावे आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

हिळ्ळी येथे भीमा नदीवर बंधारा आहे. याठिकाणी मार्च महिन्यात उजनीतून हिळ्ळीपर्यंत पाणी सोडले गेले. ते पाणी आता संपले असून भीमा नदी पूर्ण कोरडी पडली आहे. त्यामुळे पत्रात मारलेल्या खड्यातून पाणी ग्रामपंचायत नळ योजनेस घेतले जाते. ते पाणी पुरेश्या साठ्याअभावी आणि वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाच सहा दिवस झाले पाणी नीट येत नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच खासगी टँकर धारकाकडून पाच रुपये प्रति घागर या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना सर्रास पाणी विकत घेणे परवडत नाही. नदी पत्रात आहे तेवढे पाणी उचलावे तर वीजपुरवठा रात्री बारा ते सकाळी दहा असा अवेळी होत आहे. काही बिघाड झाल्यास रात्री अपरात्री नदीत जाऊन दुरुस्ती करावी लागत आहे. नदीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. शासन स्तरावर कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभी करून ही समस्या सोडविणे आवश्यक आहे. 

थ्री फेज वीज दिवसभर असल्यास शेतकरी व गावकरी यांची सोय होऊन पिकांचा व जनावरांच्या चारा पाण्याची सोय नीट होणार आहे. हिळ्ळी व परिसरातील नदीकाठावरील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात ही समस्या आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.

फेब्रुवारीपासून उसाचे बिल रक्कम कारखान्याचे आले नाही, पीक विमा रक्कम अद्याप मिळाले नाही. लाखो रुपये खर्चून ऊस लावले पण पाणी मोक्याच्या वेळी कमी पडत आहे. पाच रूपायला एक घागर पाणी विकत घेणे या सर्व बाबींचा हिळ्ळी ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. तरी प्रशासन स्तरावर या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून दिलासा द्यावा.
रविकांत बाके शेतकरी, हिळ्ळी

Web Title: people from hilli akkalkot demand regular water and electricity supply