मला घडवलं कोल्हापूरच्या माणसांनी  - आशा काळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

कोल्हापूर - ""मला आयुष्यात घडविलं ते कोल्हापूरच्या माणसांनी. दिग्दर्शक माधव शिंदे, बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर यांनी मला चित्रपटसृष्टीत उभे केले. याबरोबच जमिनीवरील पाय जमिनीवरच कसे ठेवायचे याचे या सर्वांनी भानही दिले. म्हणूनच मला आजही कोल्हापुरात येताना खूप खूप आनंद होतो. मी सर्वांना सांगते की, मी आज कोल्हापूरला जाणार आहे; मात्र माहेरच्या लोकांनी केलेले कौतुक अपुरंच वाटतं. दिग्दर्शक माधव शिंदे हे काळाच्याही पुढे गेलेले दिग्दर्शक होते. आपल्या चित्रपटांतून त्यांनी स्त्रीला सन्मान दिला. म्हणून त्यांचे चित्रपट नव्या पिढीनेही पाहिले पाहिजेत.

कोल्हापूर - ""मला आयुष्यात घडविलं ते कोल्हापूरच्या माणसांनी. दिग्दर्शक माधव शिंदे, बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर यांनी मला चित्रपटसृष्टीत उभे केले. याबरोबच जमिनीवरील पाय जमिनीवरच कसे ठेवायचे याचे या सर्वांनी भानही दिले. म्हणूनच मला आजही कोल्हापुरात येताना खूप खूप आनंद होतो. मी सर्वांना सांगते की, मी आज कोल्हापूरला जाणार आहे; मात्र माहेरच्या लोकांनी केलेले कौतुक अपुरंच वाटतं. दिग्दर्शक माधव शिंदे हे काळाच्याही पुढे गेलेले दिग्दर्शक होते. आपल्या चित्रपटांतून त्यांनी स्त्रीला सन्मान दिला. म्हणून त्यांचे चित्रपट नव्या पिढीनेही पाहिले पाहिजेत. त्यांची स्मृती जपली गेली पाहिजे'', असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. 

माधव शिंदे कुटुंबीय, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे आयोजित चित्रसाधक माधव शिंदे जन्मशताब्दी महोत्सवाला आजपासून (ता. 14) शाहू स्मारक भवनात प्रारंभ झाला. सौ. काळे यांच्या हस्ते दपिप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. देसाई कुटुंबीयांच्या वतीने सौ. काळे यांचा स्मृतिचिन्ह, माहेरची साडी, पुष्पगुच्छ, केतन पायमल या कलाकाराने काढलेले आशाताईंचे पोट्रेट देऊन सन्मान केला. तत्पूर्वी शाहू स्मारक भवनातील कलादालनात चित्रसाधक माधव शिंदे यांच्या विविध चित्रपटांतील प्रसंगावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन सौ. काळे यांच्या हस्ते झाले. 

महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर "गृहदेवता' हा चित्रपट दाखविला. हा महोत्सव 20 मेपर्यंत असेल. महोत्सवादरम्यान शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले "शिकलेली बायको', "कन्यादान', "माणसाला पंख असतात', "धर्मकन्या' हे चित्रपट दाखविण्यात येतील. 20 मे रोजी सायंकाळी पाच वाजता "गीत माधव' हा माधव शिंदे यांच्या चित्रपटातील गीतांचा कार्यक्रमही होणार आहे. महेश सोनुले, प्रसेनजी कोसंबी, अभिजित कोसंबी आदी सादरीकरण करतील. 

सौ. काळे म्हणाल्या, ""वडील फॉरेस्ट खात्यात होते. विविध ठिकाणी बदली झाली की, आम्हाला तिथे जावे लागे; मात्र आम्ही स्थायिक झालो ते कोल्हापुरात. त्यावेळी विष्णूपंत जोग, कॅमेरामन वसंत शिंदे, माधव शिंदे वडिलांना भेटण्यास येत असत. मी लहान होते. मी पहिला चित्रपट पाहिला तो "शिकलेली बायको'. चित्रपटांबद्दल मला फारसे काही माहिती नव्हते. नृत्याचे कार्यक्रम करत असे. यानंतर खऱ्या अर्थाने मी माधव शिंदे यांच्यामुळे चित्रपटसृष्टीत आले. "संसार'मध्ये मला नायिकेची भूमिका त्यांनी दिली. हा आनंद माझ्यासाठी मोठा होता. माधवराव मृदूभाषी होते. कलावंतांची खूप काळजी घेत असत. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांद्वारे समाजप्रबोधन केले.'' 

"धर्मकन्या' चित्रपटातील बालनायिका, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसुधा केसकर म्हणाल्या, ""दाजींच्या चित्रपटांचे यश मोजण्यासाठी काळाची फूटपट्टी वापरावी लागेल. त्यांचा प्रत्येक सिनेमा हा प्रबोधनात्मक होता.'' 

माधव शिंदे यांचा नातू रोहित देसाई यांनी स्वागत केले. फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. सचिव दिलीप बापट यांनी सूत्रसंचालन केले. चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सौ. माया देसाई, श्रीकांत देसाई, सौ. छाया माने, सुरेंद्र माने प्रमुख उपस्थित होते. 

Web Title: The people of Kolhapur made me