रेल्वे ट्रॅकवर गप्पांचा फड; लोकांना नाही मृत्यूची भीती!

Solapur
Solapur

सोलापूर : अमृतसर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गर्दी असणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. सुरक्षेबाबत नागरिकांत अपेक्षित जागृती नसल्याचे दिसत आहे. जागोजागी कारवाईचे फलक नावालाच आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. 

अमृतसरप्रमाणे सोलापूर विभागात लोकांची गर्दी असलेले ट्रॅक नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गर्दी होणारे ठिकाण नसले तरी रोजच अनेक ठिकाणी रेल्वेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक रुळ ओलांडत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी तर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी असून याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. जागोजागी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सूचना फलक लावले आहेत. सूचनांकडे दुर्लक्ष करून लोक बिनधास्त ट्रॅक ओलांडताना दिसतात. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, शेटे वस्ती, संभाजी तलाव परिसर, कल्याणनगर परिसरातील स्थिती धक्कादायक आहे. 

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून एक व्हिडिओ व्हॉट्‌सअपवर व्हायरल होत आहे. रेल्वे क्रॉसिंग गेटच्या ठिकाणी समोर रेल्वे आली असतानाही लोक वाहने घेऊन तसेच पुढे जात आहेत. रेल्वेतून कर्मचारी खाली उतरून लोकांना थांबवून गाडी पुढे नेत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. समोर रेल्वे आली असतानाही नागरिक स्वत:चा जीव धोक्‍यात घालून गेट ओलांडतात अशा प्रकारचा मेसेज रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्हायरल होत आहे. देशातील अनेक भागांत अशी स्थिती असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सावधान.. 
- रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवावे. 
- ट्रॅक ओलांडण्यापेक्षा पादचारी पूल आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा. 
- रेल्वे गाडी जवळ येत आहे किंवा नाही हे पाहिल्याशिवाय मानवरहित क्रॉसिंग पार करू नये. 
- मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद असेल तर ती उघडण्याची वाट पहावी. 
- रेल्वे गाडी एका सेकंदात 25 मीटर अंतर पार करते. 
- रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे गाडीजवळ सेल्फी घेऊ नये. 
- गाणी ऐकताना किंवा मोबाईलवर बोलत ट्रॅक ओलांडू नये. 

कारवाईच्या प्रमाणात वाढ व्हावी 
रेल्वे ट्रॅक ओलांडणे रेल्वे कायदा कलम 147 अंतर्गत एक दंडनीय अपराध आहे. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. कायदा असला तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. कारवाईच्या प्रमाणात वाढ होण्याची आवश्‍यकता आहे. 

गर्दी दिसली तर कमी करा वेग 
रेल्वे ट्रॅकजवळ गर्दीत दिसताक्षणी रेल्वेचा वेग कमी करा, आवश्‍यकता वाटल्यास रेल्वे थांबवा अशा सूचना लोको पायलेटला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com