सोलापूर : पाण्याशिवाय आता माघार नाही; सिना काठची गावे एकवटली

सोलापूर : पाण्याशिवाय आता माघार नाही; सिना काठची गावे एकवटली

सोलापूर : सिना नदीत कुकडीचे पाणी आल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार सिना नदी काठच्या गावातील नागरिकांनी केला आहे. नदी असूनही पाण्याचा दुसरा स्त्रोत नसल्यामुळे या भागाला सतत दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढाकार घेऊन त्यांनी संघर्ष पेठवला आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी (ता. 13) रात्री उशीरापर्यंत करमाळ्यात गावकऱ्यांची बैठक झाली. यात करमाळा तालुक्‍यातील गावांसह जवळा येथील नागरिक सहभागी झाले होते.

भिमा- सीना जोड कालव्यापासून नदीच्या उत्तरेकडील गावे नदीत पाणी राहत नसल्यामुळे दरवर्षी टंचाईच्या झळा सोसत आहेत. कुकडीचे पाणी सिना नदीच्या जवळ येत आहे, परंतु पुर्ण दाबाने ते पाणी सोडून करमाळा तालुक्‍यातील तरटगाव, पोटेगाव, संगोबा व खडकी येथील बंधारे भरल्यास सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना पाणी मिळू शकते. संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळणार नसून नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी दिशा काय ठरवायची याचा विचार विनयम करण्यासाठी स्वेच्छेने नदीकाठचे नागरिक एकत्र आले होते. यामध्ये तरटगाव, बोरगाव, निलज, बिटरगाव (श्री), पोटेगाव, पोथरे येथील तरुण सहभागी झाले होते. 

कुकडी- सिना संघर्ष समिती 

कुकडीचे पाणी मिळवण्यासाठी सिना नदी काठच्या नागरिकांनी एकत्र येऊन कोणीही अध्यक्ष, सदस्य नसलेली कुकडी- सिना संघर्ष समिती स्थापन केली. सहभागी नागरिक हे या समितीचे पदाधिकारी असतील. प्रत्येकाने नागरिकांमध्ये पाण्याबद्दल जागृती करून हे पाणी कसे मिळवता येईल याची माहिती देण्याचे ठरले. 

अशी ठरली दिशा

- कुकडीच्या पाण्यासाठी गावागावांमध्ये जाऊन जागृती करणे 
- सर्वांनी एकत्र येऊन निवेदन तयार करणे 
- मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्यासह संबंधित विभागाला निवेदन देणे 
- संगोबा येथील श्री अदिनाथ मंदिर येथे पुढील बैठक 
- ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये ठराव घेणे 
- अधिवेशन काळात यावर विचार करायला भाग पडणे. त्यासाठी रस्ता रोको, उपोषण आदी आंदोलने करणे 
- विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रश्‍न मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्कार टाकणे 

या मार्गाने आणावे पाणी 

सिना नदीजवळ मांगी व कामोणे येथील तलावात कुकडीचे पाणी येत आहे. मांगी तलावातून नदीपर्यंत चाऱ्याही केल्या आहेत. त्यातून संगोबा व पोटेगावच्या बंधाऱ्यात पाणी द्यावे. खडकी व तरटगावचा बंधारा भरण्यासाठी चौडीपर्यंत आलेले पाणी सोडवा. या पाण्याने संगोबा व पोटेगावचा बंधाराही भरता येऊ शकेल. याशिवाय कोळगावच्या धरणातही पाणी सोडावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com