दुथडी वाहणारी नदी, पुरात गेलेल्या विहरी अन् पाणीपुरवठा टँकरने

यशवंतदत्त बेंद्रे 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

- तारळे विभागात गेल्या पंधरा दिवसांत कोसळलेल्या पावसाने तारळी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात नदीकाठी असणारी पाणी पुरवठ्याच्या विहिरीला जलसमाधी मिळाली होती.

- परिणामी धनगरवाडी, काटेवाडी कातकरी वस्ती आदी ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तारळे ग्रामपंचायतीच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.

तारळे : तारळे विभागात गेल्या पंधरा दिवसांत कोसळलेल्या पावसाने तारळी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात नदीकाठी असणारी पाणी पुरवठ्याच्या विहिरीला जलसमाधी मिळाली होती. परिणामी धनगरवाडी, काटेवाडी कातकरी वस्ती आदी ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तारळे ग्रामपंचायतीच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.

गेली पंधरा दिवस तारळे विभागाला पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसाने नदी नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले होते. त्यातच तारळी धरणही नव्वद टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरू केला. यामुळे तारळी नदीची पाणी पातळी कमालीची वाढली. पावसाने उघडीप न दिल्याने नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात पाणी पुरवठा करणारी विहीरी बुडाल्या. तारळे ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या धनगरवाडी, काटेवाडी कातकरी वस्ती येथील नागरी वस्तीला पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

यावर ग्रामपंचायतीच्या वतीने या नागरिकांना होणारी पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. गेली चार पाच दिवस हा पुरवठा होत आहे. अजूनही काही दिवस हा पाणी पुरवठा टँकरनेच होणार आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. विहीर पाण्याबाहेर आल्यावर पाण्याचे टेस्टिंग करून पूर्ववत पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती उपसरपंच रामचंद्र देशमुख यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People from tarale village get water supply y tanker

टॅग्स