ताश्‍कंदमध्ये अडकलेले लोक उद्या येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी ताश्‍कंद येथे अडकून पडलेले 39 मराठी लोक परत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ते सर्वजण शनिवारी (ता. 21) ताश्‍कंद हुन विमानाने दिल्लीला परत येतील.

सांगली : मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी ताश्‍कंद येथे अडकून पडलेले 39 मराठी लोक परत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ते सर्वजण शनिवारी (ता. 21) ताश्‍कंद हुन विमानाने दिल्लीला परत येतील. त्यांना परत घेऊन येणाऱ्या विमानाचे सकाळी नऊ वाजता उड्डान होईल आणि दुपारी एक वाजता दिल्ली विमानतळावर ते परत येतील. त्यात तेरा सांगलीकरांचा समावेश आहे.

वैद्यकीय क्षेत्रात औषध कंपन्यांचे प्रतिनिधी असलेल्या लोकांसह काही डॉक्‍टर सहलीसाठी 10 मार्च रोजी उझबेकिस्तान वला रवाना झाले होते. 17 मार्च रोजी त्यांचे परतीचे विमान निश्‍चित झाले होते, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून बहुतांश आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण रद्द करण्यात आली. त्यात ताश्‍कंदहून भारतात येणारे विमानही रद्द झाले होते. त्यामुळे 39 मराठी लोक अडकून पडले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या लोकांना परत भारतात आणण्यात अडचणी येत होत्या. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून तातडीने या लोकांना परत आणण्याबाबत हालचाली कराव्यात, अशी विनंती केली. त्यानंतर भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी वेगाने हालचाली केल्या.

आता शनिवारी विमानाने हे लोक भारतात परत येतील, हे निश्‍चित झाले आहे. त्यातीलच एका सांगलीकर प्रवाशाचे विमानाचे तिकीट व्हायरल झाले आहे. या 39 प्रवाशांमध्ये सांगलीचे 13, सोलापूरचे 13, कोल्हापूर आणि नाशिकचे प्रत्येकी एक तर पुणे जिल्ह्यातील अकरा लोकांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People trapped in Tashkent will arrive tomorrow