आसरानगरातील कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

इचलकरंजी - येथील आसरानगर कचरा डेपोवरील सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्या विरोधात नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण होत असून त्याचा नजीकच्या काही दिवसांत उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. या परिसरातील एका शिष्टमंडळाने आज नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर पुन्हा एकदा आक्रमकपणे कैफियत मांडली. कचरा डेपोबाबत ठाम उपाय योजना करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आठवड्याभरात पालिकेची विशेष सभा घेण्याचे आश्‍वासन स्वामी यांनी दिले.

शहरात दररोज सव्वाशे टन कचरा निर्माण होतो. आसरानगर येथे हा कचरा टाकला जातो. येथील कचरा डेपोभवती नागरी वसाहत आहे. या डेपोवर सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे धुराचे लोट तयार होऊन परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज या परिसरातील सुरेखा लोहार, आरती कोळी, राजू कोरे, बाळासाहेब पाटील, शीतल भोजकर, रोहिदास पटेकरी, श्री. आसबे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्षा स्वामी यांना या प्रश्‍नाची माहिती दिली.

हा कचरा डेपो अन्यत्र तत्काळ हलविण्याची मागणी या वेळी करण्यात आली. यावर इस्टीमेंट तयार असून निविदा काढण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परवान्यांचे जंजाळ
आसरानगर येथील डेपोतील कचऱ्याचा वापर शहापूर येथील एक खाण बुजविण्यासाठी करण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी तब्बल 12 विविध परवाने काढावे लागत आहेत. गेल्या अनेक महिन्यानंतर पालिकेला आता 11 परवाने मिळालेले आहेत. अद्याप एक परवानगी शिल्लक आहे. ती मिळाल्यानंतर कचरा शहापूर खाणीत टाकला जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.

रास्ता रोको आंदोलन करणार
गेल्या पाच सहा महिन्यांपासून कचरा डेपोला आग लागत आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रात होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या चार दिवसांत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे नगरसेवक संजय केंगार यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.

Web Title: Peoples suffering from Aasara depo