वाढदिवस साजरा करण्याचे "यांचे' आदर्श उदाहरण

वाढदिवस साजरा करण्याचे "यांचे' आदर्श उदाहरण

सोलापूर : आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केप कापून, तो चेहऱ्याला फासून, फटाक्‍यांची आतषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते. मात्र स्वत:च्या वाढदिवशी भल्या पहाटे उठून पद्मशाली स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण करणारे तरुण पाहता समाजाबद्दलची आत्मीयता, समाज सुधारण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या पिढीचे आदर्श दर्शन घडले.

"सकाळ'ने नोव्हेंबर 2017 मध्ये "स्मशानभूमीच्या मरणकळा' ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यात आयुष्याचा शेवटचा विसावा असलेल्या पद्मशाली स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता, गैरसोयी, गैरकृत्ये आदींचे विदारक वास्तव मांडले होते. या वृत्ताला प्रतिसाद देत डिसेंबर 2017 पासून आजतागायत अतुल्य सेवा प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी परिसर स्वच्छतेची अखंडित सेवा सुरू आहे. "अतुल्य'च्या या सेवेला अनेकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत मिळत आहे.
रविवारी "अतुल्य'चे स्वयंसेवक प्रशांत कुडक्‍याल यांचा वाढदिवस त्यांनी भल्या पहाटे उठून सहकाऱ्यांसह स्मशानभूमीची स्वच्छता करून साजरा केला. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. "अतुल्य'च्या या अखंडित कार्याला नगरसेविका रामेश्‍वरी बिर्रू यांनी गरज असेल तेव्हा जेसीबीची व्यवस्था केली. नगरसेविका अनिता कोंडी व राधिका पोसा यांनी ट्री-गार्ड दिले. महापालिका उद्यान विभागातर्फे व ज्ञानेश्‍वर म्याकल यांच्यातर्फे रोपे मिळाली. "अतुल्य'चे स्वयंसेवक स्वखर्चातून गणवेश, मास्क, ग्लोव्ह्‌ज, केरसुण्या, कुदळ, पावडे, टोपल्या, पार, स्वच्छतेसाठी व वृक्षांना पाणी देण्यासाठी वाहनातून पाण्याची टाकी आदी साहित्य जमा करून शांती धाम स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत.

स्वयंप्रेरणेने स्वच्छता
"सकाळ'मधील वृत्तमालिकेमुळे "अतुल्य'चे श्रीनिवास यन्नम (कामटे) यांनी स्मशानभूमी स्वच्छतेचा ध्यास घेऊन राजेंद्र कट्टा यांच्यासह प्रत्यक्षात कार्याला प्रारंभ केला. त्यांच्या या कार्यात हळूहळू समाजबांधवांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घ्यायला सुरवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन 12 मे रोजी पुणे येथील रहिवासी रोहिणी भिमनपल्ली यांनी त्यांचा वाढदिवस "शांती धाम'मध्ये वृक्षारोपणाने साजरा केला होता.

"अतुल्य'च्या कार्याची माहिती "सकाळ'मधून मिळाली. प्रत्यक्षात स्मशानभूमीत जाऊन त्यांचे समाजकार्य पाहिले. समाजाप्रति कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाल्याने त्यांच्या कार्यात सहभागी झालो. आज माझ्या वाढदिवशी स्वच्छतेसह 25 वृक्षांचे रोपण केले. त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. माझ्या या कार्यात कुटुंबाचे प्रोत्साहन आहे.
- प्रशांत कुडक्‍याल, स्वयंसेवक, अतुल्य सेवा प्रतिष्ठान
महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com