सिद्धेश्‍वर तलाव, पार्क स्टेडियम विकासाचा मार्ग मोकळा

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले.

सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या दिल्लीतील कार्यालयात 13 नोव्हेंबरला बैठक झाली होती. बरोबर एक महिन्याने मंजुरीचे पत्र मिळाले आहे. दिल्लीतील बैठकीस पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातून निवड झालेल्या स्मार्ट सिटीत सोलापूरचा समावेश असून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा पुनर्विकास आराखडा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे मंजुरीकरिता प्रलंबित होता. आजच्या बैठकीत काही किरकोळ सूचना व दुरुस्तींसह या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर तलाव परिसरात सुशोभीकरण आणि लाइट अँड साऊंड शो सुरू करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व खात्याकडे पाठविण्यात आला होता. पूर्वनियोजनानुसार हा प्रकल्प शहरातील भुईकोट किल्ल्याच्या भिंतीवर प्रस्तावित होता. मात्र, महानगरपालिकेने भुईकोट किल्ल्याऐवजी हा प्रकल्प सिद्धेश्‍वर तलावाकरिता मंजुरीचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पाठविला होता. त्यासही मंजुरी देण्यात आल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले. 

एलईडीची सुरवात 17 पासून 
एलईडी दिवे बसविण्याचे काम 17 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, असेही श्री. ढाकणे यांनी सांगितले. बेसलाइन सर्व्हे होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर एलईडी बसविण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे जसजसा सर्व्हे होईल तसतसे एलईडी बसवावेत अशा सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र 
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनासाठी वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याची माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यास हा कार्यक्रम कोठे करता येईल याची चाचपणीही केल्याचे ते म्हणाले. त्यासाठी होम मैदानाचा परिसरही पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांनी पाहिला. 

Web Title: permission for development of siddheshwar lake and park stadium