आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचा शोध संपेना

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचा शोध संपेना

सोलापूर : आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा दिलेल्या, त्यामध्ये एक महिन्यापर्यंत कारावास भोगलेल्यांचा शोध सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून अशा व्यक्‍तींचा शोध सुरूच आहे. ज्यांनी अर्ज केले त्यांचे रेकॉर्डही तुरुंग अधीक्षकांकडे उपलब्ध नाही. 

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा राज्य शासनामार्फत गौरव करण्यात येणार आहे. तसेच अशा व्यक्तींना अथवा त्यांच्या पत्नीस मानधन देण्यात येणार आहे. परंतु, माहिती उपलब्ध होत नसल्याने जिल्हा समन्वयक म्हणून राम तडवळकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून आता माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली. 

43 वर्षांचे रेकार्ड मिळेना 
आणीबाणी जाहीर होऊन आता 43 वर्षे झाली. राज्य शासनाच्या आदेशानुसार मागील आठ महिन्यांपासून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. परंतु, तुरुंग अधीक्षकांकडे याची कागदपत्रेच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तुरुंग अधीक्षकांना पाच-सहा स्मरणपत्रेही देण्यात आली आहेत. 

ठळक बाबी... 
- एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना मिळणार मासिक दहा हजार रुपये 
- हयात नसलेल्यांच्या पत्नीस/पतीस दिले जाणार पाच हजार रुपयांचे मानधन 
- एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना मासिक रुपये पाच हजार रुपये 
- हयात नसलेल्यांच्या पत्नी अथवा पतीस मिळणार मासिक अडीच हजार रुपये 

या कागदपत्रांची गरज 
कोणत्या कायद्यान्वये शिक्षा झाली त्याचा आदेश, शिक्षेच्या निश्‍चित कालावधीबाबत नोंद असलेली कागदपत्रे उदा. (नोंदवही) अर्जदार यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, रहिवासी पुरावा, जवळील बॅंकेचे पासबुक, आंदोलनात केलेल्या कार्याची थोडक्‍यात माहिती, मूळ सत्याग्रही आंदोलनकर्ता मयत असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र व शासन निर्णयामध्ये नमूद केलेप्रमाणे परिशिष्ट अ मध्ये संबंधित तहसीलदार यांच्यासमोर केलेले शपथपत्र अशी सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com