फलटणला अनेक समस्यांचा विळखा 

फलटणला अनेक समस्यांचा विळखा 

कोळकी - फलटण शहराला वाढते अतिक्रमण, धूमस्टाइल बाईक रायडिंग, गुन्हेगारी, अपघातांची मालिका अशा अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी "फलटण स्मार्ट सिटी' करण्याचे जाहीर केलेले स्वप्न  निगरगट्ट पालिका व सुस्त प्रशासनामुळे प्रत्यक्षात उतरणार का, असा सवाल फलटणकर नागरिक विचारत आहेत. 

चौकाचौकांत वाहतूक पोलिस उभे असतात. मात्र, त्यांच्यासमोर ट्रिपल सीट बाईकस्वार मोठमोठ्याने हॉर्न वाजवत मोठ्याने आरडाओरडा करत "धूमस्टाइल' निघून जातात. अवैध प्रवासी वाहतुकीला पूर्ण बंदी असतानाही बस स्थानकाबाहेर, नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, गिरवी नाका परिसरात अवैध प्रवासी वाहतूक चौकात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोर सुरू असते. अशांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. 

अतिक्रमणांचा विळखा  
फलटणमधील बस स्थानक परिसर, सुपर मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर चौक, क्रांतिवीर नाना पाटील चौक, पृथ्वी चौक अशा जास्त वर्दळ असणाऱ्या प्रत्येक चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे. त्यातच अनेक ठिकाणी बेवारस गायींचा कळप रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेला असतो. नाना पाटील चौकात सद्‌गुरू उद्योग समूहाच्या वतीने दिलीपसिंह भोसले यांनी सामाजिक बांधिलकी जपत पाच लाख रुपये खर्च करून सिग्नल युनिट मोफत बसवून दिले आहे. मात्र, शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून त्याचा वापर केला जात नाही. परिणामी पुणे, पंढरपूर, सांगलीकडून येणाऱ्या वाहनांची या चौकात नेहमी गर्दी होते. 

पालिकेचा आडमुठेपणा  
जुन्या न्यायालयाजवळ असलेल्या चौकात श्रीमंत मालोजीराजांचा पुतळा आहे. त्याच्या एका बाजूने रस्त्यामध्ये लोखंडी बॅरिकेट्‌स सिमेंट लावून बंदिस्त केल्यामुळे वाहनधारकांना पुतळ्याला फेरी मारून जाताच येत नसल्याने या ठिकाणी अपघात हे नित्याचे झालेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे याच चौकात जुने न्यायालय, प्रांत, तहसील, तालुका व शहर भूमिअभिलेख, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय गोदाम आहे. त्यातच दर गुरुवारी व सोमवारी येथील विश्रामगृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कॅंप भरत असतो. अनेकदा तक्रारी करूनही पालिकेने येथील बॅरिकेट्‌स काढलेले नाहीत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना चौक ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. 

अरुंद रस्ते; रिंगरोडची गरज  
शहरामधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बाहेरच्या अवजड वाहनांमुळे चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, शहराच्या बाहेरून रिंगरोड तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. उघडा मारुती मंदिर ते शिवशक्ती चौकाकडून आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक (मेटकरी गल्ली) मार्गावर काही दुकानदारांनी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे रस्ता फारच अरुंद झालेला आहे. 

सहा निरपराध नागरिकांना गमवावे लागले प्राण  
गेल्या 15 दिवसांत तीन अपघातांत सहा निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागल्याने फलटणकर सुन्न झाले आहेत. त्यात विडणीजवळ पहाटे जीमला निघालेल्या तीन तरुणांना भरधाव निघालेल्या टॅंकरने ठोकरल्याने त्यांना प्राण गमवावा लागला. विडणी गावाजवळच रात्रीच्या अंधारात बंद पडलेल्या व रिफ्लेक्‍टर नसलेल्या ट्रॉलीला धडक बसून दुर्गादेवीची मूर्ती आणणाऱ्या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या अदल्याच दिवशी गिरवी नाक्‍याजवळ एका मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या टॅंकरच्या चालकाने रस्त्याकडेने हळू चाललेल्या शिक्षक बाईकस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये बाईकस्वाराला स्वतःची कोणतीही चूक नसताना प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे पोलिस ठाणे आणि रुग्णालय दोन मिनिटांच्या अंतरावर असूनही जवळपास अर्धा तास त्या शिक्षकाला मदत मिळू शकली नाही. अशा वाढत्या अपघातांना सर्वस्वी पोलिसच जबाबदार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com