फलटणला पुरे झाला पाऊस! 

फलटणला पुरे झाला पाऊस! 

फलटण - तालुक्‍याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून, सध्या सुरू असलेल्या हस्त नक्षत्रामधील संततधार पावसाने मात्र आता पुरे झाला पाऊस! अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. 

फलटण अवर्षण प्रवण भागात असल्याने वार्षिक सरासरी 383 मिलिमीटर इतकी अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरी 442 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तथापि बरड, दुधेबावी, गिरवी या मंडल भागात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही तर आदर्की, हिंगणघाट व तरडगाव या भागात प्रचंड पाऊस झाला आहे. 

26 ऑक्‍टोबरपासून सुरू झालेल्या हस्ताच्या पावसाने गेले काही दिवस चांगलाच जोर पकडला असल्याने तालुक्‍यातील बहुतेक लघु, मध्यम व मोठे तलाव, नदी, नाले, ओढ्यावरील बंधारे पूर्ण भरले असून, आता ओढ्या-नाल्यांना पूर येऊ लागले आहेत. बाणगंगा नदीवर नव्याने उभारलेले सर्व 11 पैकी आठ ते नऊ बंधारे तुडुंब झाले आहेत. अनेकांची खरीप बाजरी काढून पडली आहे, पावसामुळे तिची मळणी करता येत नाही त्याचबरोबर ती ठेवणार कोठे, या विवंचनेत शेतकरी असताना काही शेतकऱ्यांना अद्याप तयार झालेल्या बाजरीची काढणी/ खुडणीही करता आली नसल्याने खरीप बाजरीचे पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

रब्बी ज्वारी व अन्य पिकांचा पेरा आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, सततच्या पावसाने जिरायत पट्ट्यातील अल्पशा पेरण्या झाल्या असल्या तरी बळिराजा पाऊस उघडीप देण्याच्या प्रतीक्षेत असून, पाऊस उघडून वापसा आल्यावरच रब्बीच्या पेरण्या सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान सततच्या पावसाने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यावर्षी उशीरा सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

मंडलनिहाय पाऊस (सोमवारअखेर) 

महसूल मंडलनिहाय आणि त्यापुढे कंसात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये ः आसू नऊ (335), बरड 15 (380), फलटण 37 (630), तरडगाव नऊ (641), आदर्की 45 (410), गिरवी पाच (288), राजाळे 27 (507), होळ 16 (251), वाठार निंबाळकर 54 (541). आजअखेर सरासरी पाऊस 442.55 मिलिमीटर झाला आहे. काल दुपारी सुमारे तासभर शहरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहे. एकूणच आता पाऊस नको म्हणण्याची वेळ आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com