दूरदर्शनच्या केंद्राला फलटणमध्ये मुदतवाढ

फलटण - दूरदर्शनच्या लघुशक्‍ती प्रक्षेपण केंद्रावर लावण्यात आलेला फलक.
फलटण - दूरदर्शनच्या लघुशक्‍ती प्रक्षेपण केंद्रावर लावण्यात आलेला फलक.

फलटण - येथे गेली १७ वर्षे कार्यरत असलेच्या ‘प्रसार भारती’च्या अधिपत्याखालीला दूरदर्शनचे लघुशक्‍ती सहप्रक्षेपण केंद्राला मुदतवाढ दिली असली, तरी आगामी काळामध्ये हे दूरदर्शन केंद्र बंद होण्याची चिन्हे आहेत. फलटणसह कऱ्हाड, पाटण येथील केंद्रांनाही मुदतवाढ दिली असली, तरी त्यांचीही स्थिती फलटणसारखेच असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सर्व छोट्या- मोठ्या गावांसह शहरांत केबलचे जाळे निर्माण झाले आहे. डीटीएच सेवाही सुरू झाली आहे. त्यासाठी ग्राहक दरमहा २०० ते ३०० रुपये मोजतो. या पार्श्‍वभूमीवर दूरदर्शनसेवा मोफत आहे आणि ग्रामीण भागातही त्याची सेवा चांगल्या प्रकारे मिळते आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वाई, कोरेगाव व वसंतगड येथील लघुप्रक्षेपण केंद्रे बंद झाली असून, आगामी काळात फलटणसह पाटण आणि कऱ्हाड या केंद्रांवर बंदीचे गंडांतर येणार अशी स्थिती आहे. शहरात १९८३ मध्ये तत्कालीन आमदार शिवाजीराजे नाईक- निंबाळकर यांनी लघुप्रक्षेपण केंद्र असावे याबाबत केंद्र शासनाच्या तत्कालीन विभागाला पत्र लिहिले होते. त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने अन्य आमदारांच्याही प्रयत्नांना जून २००० मध्ये जिल्ह्यात सहा ठिकाणी टप्प्याटप्प्यांनी दूरदर्शनची लघुशक्‍ती प्रक्षेपण केंद्रे सुरू झाली. आजच्या स्थितीत ‘केबल वॉर’मुळे आणि विविध वाहिन्यांच्या स्पर्धेत दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव राहिला नाही. त्याचबरोबर त्यावरील कार्यक्रमांनाही आज फारसे स्थान दिसत नाही. दैनंदिन बातम्या, आरोग्य, शासकीय कार्यक्रम, अधिवेशन, राजकीय कार्यक्रम यांना यामध्ये प्राधान्य असते. हे जरी खरे असले तरी दूरदर्शनची गरज आज आहेच. 

दरम्यान, ही केंद्रे बंद करण्याबाबत शासनाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, फलटणच्या नगराध्यक्षा नीता नेवसे आणि तालुक्‍यातील ग्रामपंचायत सरपंचांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री स्मृती ईराणी यांच्याकडे फलटणचे केंद्र सुरू ठेवण्याबाबत पाठपुरावा केला.

त्यातूनच वाई, कोरेगाव, वसंतगड केंद्र बंद झाल्यानंतर फलटण, कऱ्हाड, पाटण केंद्र आजच्या स्थितीत बंद नसली तरी भविष्यात बंद होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. दूरदर्शन सेवा ही जनतेला मोफत उपलब्ध आहे आणि एकदा बंद झाली, तर ती पुन्हा लवकर सुरू होणे कठीणप्राय आहे अशा स्थितीत केंद्र बंद करू नये, अशी मागणी फलटण शहरातील सामान्य नागरिकांमधून केली जात आहे. फलटणचे दूरदर्शनचे सहप्रक्षेपण केंद्र सध्या मुधोजी महाविद्यालयाच्या परिसरात नाममात्र भाड्यात उपलब्ध करून घेतलेल्या इमारतीत सुरू आहे. त्याला जोडूनच आकाशवाणीचे एफएम बॅंण्ड प्रसारण सुरू करण्याची मागणी त्यावेळेपासून अद्याप प्रलंबित आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने जिल्ह्यात असलेली सर्व केंद्रे सुरू ठेवावीत, अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com