फलटणकरांना "रेल्वे'नंतर "सिटी बस'चे वेध 

फलटणकरांना "रेल्वे'नंतर "सिटी बस'चे वेध 

कोळकी  ः फलटण शहर व परिसराची लोकसंख्याही लाखाच्या आसपास पोचली आहे. शहरात रिकाम्या जागा आता शिल्लक नसल्यामुळे शेजारील गावांमध्ये शेतजमिनीचे बिगरशेती प्लॉट करून मोठमोठ्या अपार्टमेंट, हाउसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह इतर दैनंदिन महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी सध्या नागरिकांना सर्रास रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. त्यातच रिक्षाचे दर परवडत नसल्याने शहरवासीयांना आता "रेल्वे'नंतर "सिटी बस'चे वेध लागले आहेत. 

शहर व परिसराची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. बस स्थानकापासून न्यायालय, मुधोजी महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, डीएड कॉलेज, 
नर्सिंग कॉलेज, आयटीआय, फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाणे, कमिन्स कंपनीकडे जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रिक्षाभाडे परवडत नाही. या सर्वांचे अंतर स्टॅण्डपासून अर्धा ते चार किलोमीटर एवढे आहे. फलटण शहरामधील तसेच तालुक्‍यातील लोकांची नेहमी या ठिकाणी ये-जा सुरू असते. बऱ्याच वेळा रिक्षाचे भाडे अव्वाच्या सव्वा घेतले जाते. 

फलटण शहराला लागूनच असलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, सस्तेवाडी, चौधरवाडी ही गावे फलटण शहराची उपनगरे झालेली आहेत. या ठिकाणाहूनही शाळेचे विद्यार्थी, कर्मचारी, इतर नागरिकांची व्यवसाय, नोकरीनिमित्त फलटणमध्ये ये-जा सुरू असते. शेजारील उपनगरांत बॅंकांची सोय नसल्याने सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्ग यांनाही फलटणमध्ये यावे लागते. शाळेच्या विद्यार्थ्यांना ने- आण करणाऱ्या स्कूल बस, खासगी व्हॅनमध्ये विद्यार्थी खचाखच भरलेले असतात. अशा सर्वांनाच "सिटी बस'चा उपयोग होऊ शकतो. फलटण शहर व शेजारील उपनगरांचा विस्तार जवळपास सहा ते सात किलोमीटर आहे. चौधरवाडी येथील रेल्वे स्टेशन सुरू होताच "सिटी बस'ची कमतरता नक्कीच जाणवणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून फलटणकरांच्या आत्मियतेचा "सिटी बस'चा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे. 

...असा असावा सिटी बसचा मार्ग 
1) अक्षतनगर कोळकी, बुवासाहेबनगर, पृथ्वी चौक, बस स्थानक, डॉ. आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, गजानन चौक, मारवाड पेठ, मुधोजी कॉलेजमार्गे नर्सिंग कॉलेज. 
2) श्रीराम सहकारी साखर कारखाना, मार्केट यार्ड, बस स्थानक, भगवान महावीर चौक, डेक्कन चौक, महात्मा फुले चौक, तहसील कार्यालय, गिरवी नाका, शहर पोलिस ठाणे, नवीन कोर्ट, विमानतळ, भडकमकरनगर, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश स्कूल, आयटीआय, डीएड कॉलेज. 
3) बस स्थानक, बारामती चौक, पाचबत्ती चौक, हरिबुवा मंदिर, उम्ब्रेश्वर चौक, जिंती नाका, शेतीशाळामार्गे चौधरवाडी रेल्वे स्टेशन. 
4) बस स्थानक, बारामती चौक, उघडा मारुती मंदिर, शिवशक्ती चौक, शिंपी गल्ली, राजवाडा, शंकर मार्केट, शुक्रवार पेठ, श्रीरामेश्वर गणपती मंदिर. 
5) बस स्थानक, रिंगरोडमार्गे पृथ्वी चौक, जुना डीएड चौक, लाकडी चौक, गिरवी नाका, साई मंदिरमार्गे कॉटेज हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज.  


फलटण शहर व परिसराचा विस्तार मोठा झाल्यामुळे सिटी बस सुरू झाल्यास तालुक्‍यातील विद्यार्थी, महिला, वयस्कर लोकांना निश्‍चितच फायदा होईल.
दत्तात्रय बोडके, फलटण. 


माझी शाळा फलटणमध्ये असून लांब पल्ल्याच्या एसटी बस कोळकी थांब्यावर थांबत नसल्याने मला बऱ्याच वेळा चालत शाळेत यावे लागते. सिटी बस झाल्यास हा प्रश्न मिटून जाईल.

आदित्य वाडेकर, विद्यार्थी, फलटण हायस्कूल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com