पीएच.डी.शिवाय वेतनवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतेच नवे नियम जाहीर केले. त्यानुसार सहायक प्राध्यापक या किमान श्रेणीतील पदावरील नियुक्‍तीसाठी नेटसह पीएच.डी. असणे अनिवार्य केल्याने "नेट' उत्तीर्ण भावी प्राध्यापकांची अडचण झाली आहे. याशिवाय प्राध्यापकांना पीएच.डी.शिवाय वेतनवाढ मिळणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. हे नवे नियम नवीन शैणक्षणिक वर्षापासून (1 जुलै 2019) लागू होणार आहेत.

महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या थेट नियुक्‍तीसाठी सध्या असलेली नेट अथवा पीएच.डी.ची पात्रता कायम राहणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार "यूजीसी'ने हे नियम जाहीर केले आहेत. काही वर्षांपासून राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये पदोन्नती व वाढीव वेतनासाठी प्राध्यापक पीएच.डी. करायचे. मात्र, आता विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठीच पीएच.डी. आवश्‍यक केली आहे. शिक्षक भरतीच्या नियमानुसार मिळणारे सर्व प्रकारचे प्रोत्साहनपर भत्ते कायम ठेवण्यात आले आहेत. परंतु, ऍकेडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर्सवर (एपीआय) आधारित कामगिरीच्या मूल्यमापन प्रणालीऐवजी श्रेणी प्रणाली लागू केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार नव्याने नियुक्‍त केल्या जाणाऱ्या प्राध्यापकांना "नेट' बरोबरच पीएच.डी. बंधनकारक आहे. सध्या सेवेत असलेल्या प्राध्यापकांना पीएच.डी.शिवाय वेतनवाढ मिळणार नाही. सोलापूर विद्यापीठांतर्गत 109 महाविद्यालयांमध्ये सुमारे 900 प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यापैकी पीएच.डी. किती जणांकडे नाही, याची माहिती संकलित केली जात आहे.
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

Web Title: PH.D Salary University College Professor