गावागावांतील रूबाबदार फेटेवाले बाबा गेले कुठे ?

सदाशिव पुकळे
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

अगदी शालेय जीवनापासून मुलांच्या डोक्‍यावर टोप्या परिधान केलेल्या असायच्या. तर प्रोढ अवस्थेतील माणूस फेटा परिधान करायचा.

झरे (सांगली)  - एका काळात गाव वाड्या वस्त्यावर फेटेवाले बाबा नजरेत पडायचे. त्यातच गावगाड्यातही फेट्यालाही अनन्यसाधारण मान असायचा.  मात्र, गत काही वर्षांपासून माणसांच्या डोक्‍याचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करणारा फेटा आता शेवटच्या घटका मोजत असून, आज  गावागावांमध्ये फेटेवाले दिशेनासे झालेले आहेत. पूर्वीचे फेटे बांधणारे आज सापडत नाहीत.

त्याकाळात डोक्‍यावर काही न घालता राहणे याला योग्य माणले जात नव्हते, त्यावेळी अगदी शालेय जीवनापासून मुलांच्या डोक्‍यावर टोप्या परिधान केलेल्या असायच्या. तर प्रोढ अवस्थेतील माणूस फेटा परिधान करायचा. पानकोर, कोसला, कळीचा फेटा असे विविध प्रकारचे फेटे काॅटन पॉलिस्टर , चुन्री या कपड्यापासून बनविलेले फेटे गतकाळी असायचे. विवाहाच्या वेळी बस्त्यातच वरासाठी विशेष फेटा घेतला जायचा.

तसेच तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत डोक्‍यावर फेटा असायचा. हा फेटा पावसाळ्यात पावसापासून, उन्हाळ्यात उष्णतेपासून तर हिवाळ्यात थंडीपासून डोक्‍याचे संरक्षण करायचा. सांगायचे म्हणजे त्याकाळात हा फेटा हेल्मेटचे कार्य करायचा. परिसरात ठरावीकच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत फेटेवाले दिसत असल्याचे चित्र आहे.

माझे वय 95 वर्षे आहे. वयाच्या २० व्या वर्षापासुन मी डोक्याला फेटा वापरतो. त्या काळात भारीतला फेटा ५ ते १० रुपयाला मिळायचा, मात्र आज बघितले तर कोसल्या फेट्यासाठी ७०० ते १००० रुपये मोजावे लागतात. 
- दिनकर वाघमोडे

माझे वय 90 आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षापासून डोक्याला फेटा बांधत आहे. फेटा डोक्याला नसेल तर काहीतरी विसरल्या सारखे वाटतं. चैन पडत नाही. त्याची इतकी सवयच लागली आहे.
 - रामचंद्र पाटील

फॅशन म्हणून फेट्याचा वापर 

आज फँशन म्हणून फेट्याचा वापर केला जातो. लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, सामाजिक राजकीय सोहळ्यांच्या ठिकाणी फेट्यांचा वापर केला जातो. हे फेटे बांधायचे कसे याची माहिती नसल्याने फेटे बांधणाऱ्याला बोलाविले जाते. काहीजणांना टोपी घालण्याची सवय असते. उन्हाळ्यात तरूणांमध्येही रोज टोपीचा वापर करणारे काहीजण आहेत. पण दररोज फेट्यांचा वापर ही पद्धत आता तरूणांमध्ये दिसून येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pheta Tradition In Todays Youth Generation Not Seen