पिचड म्हणतात, एकास एक लढत झाली तर आनंदच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

""विरोधकांनी मागील निवडणुकीतही एकास एकचा प्रयत्न केला होता; पण तो सफल करता आला नाही. त्यामुळे एकास एक निवडणूक झाली तरी आपल्याला आनंदच होईल. त्यांना जनाधार राहिलेला नाही. तालुक्‍यात ते पाच वर्षे फिरकलेच नाहीत. लोकांचे प्रश्न माहीत नाहीत. संवाद राहिला नाही. त्यामुळे त्यांना आता जनसंवाद करावा लागत आहे.''

अकोले (नगर) : ""विरोधकांनी आदिवासी दिन साजरा करण्याऐवजी तालुक्‍यात एकास एकचे राजकारण सुरू केले आहे. तालुक्‍यातील जनता विकासाबरोबर जाणारी आहे. एकास एक लढत झाली तर आनंदच होईल. विरोधकांची कायमची खदखद एकदाची दूर होईल व आपण विक्रमी मताधिक्‍याने विजयी होऊ,'' असा विश्वास आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केला.

शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात पिचड पत्रकारांशी बोलत होते. अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, मारुती मेंगाळ यांनी तालुक्‍यात पिचड यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यावर पिचड म्हणाले, ""विरोधकांनी मागील निवडणुकीतही एकास एकचा प्रयत्न केला होता; पण तो सफल करता आला नाही. त्यामुळे एकास एक निवडणूक झाली तरी आपल्याला आनंदच होईल. त्यांना जनाधार राहिलेला नाही. तालुक्‍यात ते पाच वर्षे फिरकलेच नाहीत. लोकांचे प्रश्न माहीत नाहीत. संवाद राहिला नाही. त्यामुळे त्यांना आता जनसंवाद करावा लागत आहे.''

ते म्हणाले, ""माजी मंत्री मधुकर पिचड व आपण कधीही सूडाचे, विरोधकांचे आयुष्य संपविण्याचे राजकारण केले नाही. गेल्या दोन निवडणुकांपासून तालुक्‍याबाहेरील उमेदवार येथे येऊन दहशत, दादागिरी करीत आहेत. मागील वेळी आमच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण केले होते. निवडणुकीतील वाद तात्पुरता, म्हणून आपण तो प्रकार विकोपाला नेला नाही. बाहेरची ही संस्कृती तालुक्‍यात सहन होत नाही. त्यामुळे जनताच त्यांचा बंदोबस्त करील.''

सरकारच्या गड-किल्ल्यांच्या निर्णयावर पिचड म्हणाले, ""शासनाचा हा निर्णय सकारात्मक असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी व शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांव्यतिरिक्त, तसेच ऐतिहासिक वारसा नसलेले अनेक गड-किल्ले राज्यात आहेत. त्यांची पडझड होऊन दुर्लक्षित आहेत. त्यांचा विकास होऊन पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा हा उपक्रम आहे.''
 

महाजनादेश यात्रा शुक्रवारी अकोल्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरवात अकोल्यातून होत आहे. येत्या शुक्रवारी (ता. 13) ही यात्रा अकोल्यात येत असून, सकाळी 11 वाजता आयटीआय मैदानावर सभा होणार आहे. सभेनंतर मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची रॅली महाजनादेश यात्रेच्या रथातून शहरातून जाणार असल्याचे पिचड म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pichad criticize the opposition