लय भारी ! छंद असावा तर असा; चाैथ्या पिढीलाही 'तोच' नाद

बाळासाहेब गणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नांद्रे (ता. मिरज) येथील हाजी सिकंदर मुल्ला हे आवलिया यापैकीच एक. मुल्ला यांना कबूतर पाळण्याचा छंद त्यांचे वडील चांद मुल्ला यांच्यामुळे लागला. त्यांची चौथी पिढी सुरज व शकील मुल्ला हे कबूतरांची जपणूक करत आहेत.

तुंग (सांगली) : पूर्वीच्या काळी संदेशवाहक म्हणून पशुपक्षी प्राणी यांचा वापर केला जायचा. यापैकी संदेशदुत व शांतीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कबुतरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. तंत्रज्ञानामुळे काळाच्या ओघात  त्यांचा राजाश्रय संपला वापर कमी झाला .सध्याच्या काळात लोकाश्रयाच्या माध्यमातून छंद म्हणून कबुतरांना सांभाळणारे काही कबूतरप्रेमी पुढे आले आहेत. 

नांद्रे (ता. मिरज) येथील हाजी सिकंदर मुल्ला हे आवलिया यापैकीच एक. मुल्ला यांना कबूतर पाळण्याचा छंद त्यांचे वडील चांद मुल्ला यांच्यामुळे लागला. त्यांची चौथी पिढी सुरज व शकील मुल्ला हे कबूतरांची जपणूक करत आहेत. सध्या त्यांच्याकडे वेगवेगळ्या सहा जातींसह 60 कबुतरे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कबुतरांचा लौकिक दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. वर्षभरात झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांच्या कबुतरांनी साडे पाच लाखाचे बक्षीस मिळवून देत मालकासह नांद्रेचा लौकीक वाढवला आहे.

हेही वाचवा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

कबुतराला पाहण्यासाठी पाहुणे दिल्लीतून नांद्रेत 

विजेत्या कबुतराला पाहण्यासाठी खास दिल्लीतील पाहुणे नांद्रेत दाखल झाले. आणि त्या कबुतरासह मालकाचेही कौतुक केले. ते म्हणाले पुर्वी फक्त कबुतर सांभाळली जायची हळू हळू त्यांच्या स्पर्धा होऊ लागल्या. नांद्रेचे चांद मुल्ला,आप्पासाहेब फर्जन व तुंगचे महादेव बुवा डांगे यांनी एकत्र येत सांगलीमध्ये स्पर्धेला सुरुवात केली. आणि ही स्पर्धा सध्या महाराष्ट्रभर होते.

कबुतराचा शेवटपर्यत सांभाळ करण्याची इच्छा  

 चार महिन्यापुर्वी नांद्रेच्या कबुतराने बारा तास चार मिनिटे अवकाशात विहार करून प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र केसरी  किताब मिळवला. मुल्ला यांच्या कबुतराने 5 लाख 38 हजाराची बक्षिसे व एक मोटर सायकल जिंकून दिली. या कबुतराला दिल्लीचे कबूतर शौकीन पप्पू उस्ताद व रिजवान यांनी भेट दिली. त्यांनी विजेत्या कबुतराची मागेल त्या किमतीत मागणी केली. परंतु त्यानी नकार दिला. या कबुतराचा शेवटपर्यत सांभाळ करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

सहा प्रकारची पाखरे

कबुतराच्या 'टोपल सुरणा नर' च्या तिसऱ्या पिढीने बक्षीस मिळवून दिले आहे. पालनकर्त्याच्या चौथ्या पिढीला कबुतराच्या तिसऱ्या पिढीने बक्षीस मिळवून देत खऱ्या अर्थाने मानव आणि पशुपक्षी यांच्यातील प्रेम संबंध वाढविला आहे. सध्या हाजी मुल्ला त्यांची दोन मुले सुरज व शकील हे कबुतरांना सांभाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोईमतुर, देशी, खडक, लकी, मद्राशी अशी सहा प्रकारची पाखरे आहेत.

स्पर्धेतील विजयानंतर कबुतरांची गावात मिरवणूक 

दिवसातून तीन वेळा ते या पाखरांना बाहेर काढतात. त्यांना रोज शाळू, करडा, नाचणी हे खाद्य देतात. स्पर्धेच्या दरम्यान खास बदाम घातले जाते. आजपर्यंत येथील कबुतरांनी प्रत्येक वर्षी एप्रिल ते मे यादरम्यान स्पर्धा होतात. या ते सहभाग घेतात. आत्तापर्यंत पन्नास स्पर्धेमध्ये बक्षीस मिळविले आहे. बक्षीस मिळाल्यानंतर गावातील कबूतर शौकीन एकत्रित येत या विजेत्या कबुतरासह मिळालेल्या चांदीच्या गदा जीपला लावुन मिरवणूक काढली जाते.

स्पर्धेसाठी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान सराव

जिल्ह्यासह वेगवेगळ्या भागात पाखरांच्या पेटी आहेत. स्वताची पाखरे ओळखण्यासाठी त्यावर विशिष्ट प्रकारचा शिक्का मारला जातो. त्याचबरोबर ही पाखरे बुद्धीने हुशार व नजरेने तीक्ष्ण असतात. ते आपले ठिकाण शोधून काढतात. अशा या पाखरांना मानमोडी, अटॅक व इतर रोगापासून जपावे लागते. त्यांना सहा महिन्यातून एकदा लसीकरण केले जाते. रोज त्यांना दोन किलो धान्य लागते. स्पर्धेच्या तयारीसाठी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान कबुतरांचा सराव घेतला जातो. त्याचबरोबर त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी जुने पंख काढले जातात. बदाम सारखा खुराक त्यांना दिला जातो.

पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी 

मुल्ला यानी या पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी टेरेसवर वीजेसह खास सोय केली आहे. या कबुतरांना कुत्रा, मांजर, ससाना,घार यापासून जपावे लागते. या पाखराचे सरासरी वयोमान 17 ते 22 वर्षाचे असते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pigeon Keeping Hobby To Mulla Family Nandre Sangli