कोल्हापूरः पोलिसाच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटली गोळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कळंबा - उपनगरातील एक बारमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. बॉडीगार्ड म्हणून दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून बारमध्ये ही गोळी सुटली आहे.

कळंबा - उपनगरातील एक बारमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. बॉडीगार्ड म्हणून दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून बारमध्ये ही गोळी सुटली आहे. ही माहिती पोलिस डायरीपर्यंत सायंकाळपर्यंत पोचली नाही. मात्र, रात्री हा प्रकार विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना कळाल्यानंतर याचा तपास खोलवर गेला. रात्री उशिरा त्या पोलिस कर्मचाऱ्याला बोलावून घेतले असल्याचे अधीक्षक देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा बॉडीगार्ड असलेला पोलिस कर्मचारी, संबंधित फिर्यादी आणि त्याचा मित्र जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनगरातील एका बारमध्ये रंगीत पार्टी करण्यासाठी बसले होते.

दुपारी रखरखते ऊन असल्यामुळे ते बारमधील 
वातानुकूलीत खोलीत बसले. पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर दाखविण्यासाठी टेबलवर ठेवले. यावेळी अचानक गोळी सुटल्याचा आवाज झाला. याचवेळी बारमधील ग्राहक भीतीने काय झाले म्हणून एकमेकांकडे पाहू लागले. काही क्षणातच वातानुकूलीत खोलीकडे सर्वांचे लक्ष गेले. थोड्याच वेळात दरवाजा लावून घेण्यात आला. संबंधित बारच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनी काही झाले नाही. बाटली फुटली असल्याचे सांगून सर्वांना शांत केल्याचे सांगण्यात आले.

याचवेळी तेथील कोणी तरी संबंधित पोलिस ठाण्याकडे याची माहिती दिली. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पुढे काहीच झाले नाही. ही माहिती कळाल्यानंतर याबाबतची विचारणा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यांनी याची माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. अखेर रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटना सीसीटीव्हीत कैद
घटना घडलेल्या बारमध्ये सीसीटीव्ही कैद आहे. जिल्ह्यातील एका गॅंगमधील म्होरक्‍याच्या विरोधात फिर्याद दिली म्हणून त्याला पोलिसांचे संरक्षण दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुद्द पोलिसाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्यामुळे तेथे नेमके काय घडले आहे, यावर शहरात चर्चा होती. तपासात सविस्तर घटना पुढे येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: pill by the police revolver